बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलेल्या शशिकला यांना अद्याप सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पचवता आलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने शशिकला यांना ४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यानंतर बुधवारी शशिकला यांची रवानगी पारप्पना अग्रहारा तुरुंगात करण्यात आली. यावेळी पोलीस जीपमधून शशिकला यांना तुरुंगात नेत होते. मात्र शशिकला यांनी जीपमध्ये बसण्यास नकार दिला. ‘मी कोणी छोटी-मोठी चोर नाही. त्यामुळे मी पोलिसांच्या जीपमध्ये का बसू?,’ असा सवाल शशिकला यांनी पोलिसांना विचारला. टाईम्स ऑफ इंडियाने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

मागील वेळी प्रमाणे यंदा पोलिसांकडून विशेष वागणूक मिळेल, अशी शशिकला यांची अपेक्षा होती. शशिकला यांना मागील वेळी जयललिता यांच्यासोबत अटक करण्यात आली होती. त्यावेळी जयललिता तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. त्यावेळी जयललिता आजारी असल्याने त्यांना अ श्रेणीतील सुविधा मिळाल्या होत्या. जयललिता यांच्यासोबत असलेल्या शशिकला यांनादेखील अ श्रेणीतील सुविधांचा लाभ मिळाला होता.

शशिकला यांना विशेष वागणूक देण्याची मागणी न्यायालयाने धुडकावून लावली आहे. शशिकला यांचा तुरुंगातील पहिला दिवस शांततेत गेला.
त्या संपूर्ण रात्र झोपू शकल्या नाहीत, असे टाईम्स ऑफ इंडियाने वृत्तात म्हटले आहे. शशिकला यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांना एक पलंग उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यासोबतच शशिकला यांना एक पांढरी साडी देण्यात आली आहे. मात्र या साडीसोबत मॅचिंग ब्लाऊज नसल्याने शशिकला यांनी साडी नेसली नाही. गुरुवारी रात्री शशिकला काही तास झोपल्या होत्या.

बेहिशेबी संपत्ती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अण्णाद्रमुकच्या महासचिव शशिकला यांना दोषी ठरवले. शशिकला यांनी बुधवारी परापन्ना तुरुंगात आत्मसमर्पण केले. यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. शशिकला सेल नंबर १०७११ मध्ये केंदी नंबर ९४३४ म्हणून शिक्षा भोगत आहेत. शशिकला यांनी तुरुंगात मेणबत्ती बनवण्याचे काम केले आहे. या कामाबद्दल शशिकला यांना ५० रुपये मिळाले आहेत.