पंतप्रधानपद का स्वीकारले नाही याबाबतचे सत्य मी स्वत: लिहिणार असलेल्या पुस्तकातून बाहेर येईल असे म्हणत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी माजी परराष्ट्र मंत्री नटवरसिंग यांच्या खळबळजनक दाव्यावर प्रत्युत्तर दिले आहे.
एनडीए सरकारचा पराभव करून २००४ मध्ये काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर आले तेव्हा सोनिया गांधी पंतप्रधान न होण्यास ‘अंतर्मन’ नव्हे तर राहुल गांधी यांचा तीव्र विरोध कारणीभूत असल्याचा गौप्यस्फोट नटवरलाल यांनी केला आहे.
यावर सोनिया गांधी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, “मी स्वत: माझ्या जीवनावर आधारित पुस्तक लिहीणार आहे आणि त्यातूनच खरे सत्य बाहेर पडेल. जेव्हा मी खरच लिहीण्यास सुरूवात करेन तेव्हा खरे सत्य बाहेर येईल आणि पुस्तक लिहीण्याबाबत मी गंभीर आहे.” असेही त्या म्हणाल्या. तसेच “अशा शाब्दीक हल्ल्यांनी मला कोणतेही दु:ख होत नाही. माझ्या सासूला गोळ्या घालून मारल्याचे मी पाहिले आहे. अनेक लोक आमच्या बद्दल अनेक गोष्टी बोलतात पण, त्यामुळे अशा शाब्दीक हल्ल्यांनी मला काहीच होणार नाही.” असेही सोनिया म्हणाल्या.
सोनिया पंतप्रधान न होण्यास ‘अंतर्मन’ नव्हे तर राहुल कारणीभूत
नटवरसिंग यांचे ‘वन लाइफ इज नॉट इनफ : अ‍ॅन ऑटोबायोग्राफी’ हे पुस्तक येत्या काही दिवसांत प्रकाशित होत आहे. सोनियांनी पंतप्रधानपद न स्वीकारण्यामागे राहुल यांची भीती होती. सोनिया पंतप्रधान झाल्यास आजी इंदिरा व वडील राजीव यांच्याप्रमाणेच त्यांचीही हत्या होईल, अशी भीती राहुल यांना वाटत असल्याने सोनियांनी पंतप्रधानपद नाकारले, असा दावा नटवरसिंग यांनी एका चित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.