चेन्नईकडून पोर्ट ब्लेअरकडे निघालेले भारतीय वायूदलाचे एएन-३२ हे विमान  शुक्रवारी सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी बेपत्ता झाले. २४ तासांहून अधिक काळा उलटून गेला असला तरी या विमानाचा शोध अद्यापही लागला नाही. या विमानाचा शोध घेण्यासाठी शनिवारी सकाळी विमाने पाठवण्यात आली होती परंतु शोधकार्यात अडथळा येत असल्यामुळे ही विमाने तम्बाराम विमानतळावर परतली आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी  देखील शनिवारी चैन्नईतील तम्बाराम विमानतळाला भेट दिली होती. तसेच  येथील संपूर्ण शोधमोहिमेचा त्यांनी आढावा घेतला होता. या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या पी८आय या विमानातून संपूर्ण शोधमोहिमेची माहिती पर्रिकर यांनी घेतली होती. 

शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हे विमान पोर्ट ब्लेअरकडे रवाना झाले होते. त्यानंतर त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि रडारवरून हे विमान दिसेनासे झाले. या विमानामध्ये २९ प्रवासी आहेत. यात दोन वैमानिक, एक दिशादर्शक, तीन जवान, हावाई दलाचे ११ जवान, लष्कर, तटरक्षक दल,  नौदलाच्या सैनिकांचा  आणि त्यांच्या कुटुंबियांचा देखील समावेश आहे. शुक्रवार पासूनच या विमानाची शोधमोहिम सुरू आहे. बंगालच्या उपसागरात या विमानाचा कसून शोध सुरू आहे. विमानाच्या शोधासाठी हवाई दल, नौदल तटरक्षक दलाची संयुक्तरित्या शोधमोहिम सुरू आहे.  या विमानाचा शोध घेण्यासाठी एक पाणबुडी तटरक्षक दलाच्या १३ नौका आणि आठ विमाने तैनात करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी हे विमान बंगालच्या उपसागरावरून उडत होते. काहीच दिवसांपूर्वी या विमानात तांत्रिक दोष असल्याचे समोर आले होते.