लोकसेवा आयोगातर्फे फक्त ९८० अधिकाऱ्यांच्या जागा भरणार

केंद्र सरकार केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून यंदा आयएएस, आयएफएस तसेच आयपीएससारख्या पदांसाठी ९८० अधिकाऱ्यांची भरती करणार असून, ही मागील पाच वर्षांतील सर्वात कमी पदभरती आहे.

वर्ष २०१५ आणि २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांच्या माध्यमातून अनुक्रमे एक हजार १६४ आणि एक हजार ७९ पदांसाठी भरती करण्यात आली. मागील वर्षी घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल अद्याप हाती आलेले नाहीत.

वर्ष २०१४ आणि २०१३ मध्ये अनुक्रमे एक हजार ३६४ आणि एक हजार २२८ पदे रिक्त होती. या परीक्षांचे आयोजन करणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिसूचनेमध्ये वर्ष २०१२ मध्ये विविध केंद्रीय सेवांसाठी एकूण एक हजार ९१ रिक्त पदासांठी जाहिरात देण्यात आली होती.

नव्याने करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये वर्ष २०१७ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या पदांची संख्या ९८० असणार असून, यामध्ये २७ पदे ही अपंग o्रेणीसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत. या परीक्षेद्वारे भरण्यात येणारी ही मागील पाच वर्षांतील सर्वात कमी आकडेवारी आहे.

तीन वर्षांनंतर लोकसेवा आयोग जूनमध्ये परीक्षेचे आयोजन करत आहे. वर्ष २०१६, २०१५ आणि २०१४ च्या परीक्षेसाठी प्राथमिक परीक्षा ऑगस्टमध्ये घेण्यात आली होती. प्राथमिक परीक्षेसासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ मार्चला असल्याचे लोकसेवा आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले.

प्राथमिक परीक्षा १८ जूनला

लाखोच्या संख्येमध्ये विद्यार्थी लोकसेवा आयोगाची परीक्षा देतात. तीन टप्प्यांत होणाऱ्या या परीक्षेच्या माध्यमातून देशातील महत्त्वाच्या प्रशासकीय अधिकारी पदांवर नियुक्ती करण्यात येते. वर्ष २०१७ लोकसेवा आयोगाची प्रथम परीक्षा ऑगस्टच्या ऐवजी आता १८ जूनला आयोजित करण्यात येणार आहे.

untitled-22