काश्मीर प्रश्नासंदर्भात पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयात जात असल्याप्रकरणी काँग्रेसने जोरदार टीका केली. भारत आणि पाकिस्तानमध्ये मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून सोडविला जाणारा नाही, असे मत पी.सी. चाको यांनी मांडले. काश्मीरचा वाद आणि कुलभूषण जाधव अटक प्रकरण हे दोन्ही अतिशय वेगळे विषय आहेत. त्यामुळे काश्मीरप्रश्नासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठाविल्यास ती पाकिस्तानची मोठी चूक ठरु शकते, असे चाको म्हणाले.

चाको म्हणाले, कुलभूषण जाधव प्रकरणामध्ये भारताकडे आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये जाण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र काश्मीर प्रश्न हा दोन्ही देशांतील वाद असून, तो भारत आणि पाकिस्तानने आपापसांत सोडविणे गरजेचे आहे. त्यामुळे याबाबतीत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयात जात असेल तर ती खूप मोठी चूक ठरु शकते.

काश्मीर प्रश्नाबाबत विविध पातळ्यांवर चर्चा चालू असताना हा प्रश्न दहशतवादाशी निगडीत असून तो दोन देशांमध्ये आपापसात सुटायला हवा असे परराष्ट्र मंत्रालयाकडून नुकतेच सांगण्यात आले असल्याचेही चाको म्हणाले. हिज्बुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या बुऱ्हान वाणी ठार झालानंतर काश्मीरमधील तणाव वाढला आहे. त्यानंतर झालेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत भारताच्या ८० जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव प्रकरणाचा नुकताच अंतरिम निकाल दिला आहे. त्यानुसार पाकिस्तानी न्यायालयाने जाधव यांना ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे.