कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला मोठा दणका दिलेला आहे. जाधव हे हेर आहेत की नाहीत हे अद्याप सिद्ध झालेले नाही, असे सांगून जाधव हे ‘रॉ’चे एजंट असल्याचा पाकिस्तानचा दावा फेटाळून लावला आहे. अंतिम निकाल येईपर्यंत पाकिस्तानने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करू नये, असा महत्त्वपूर्ण निकाल आज, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्यास पाकिस्तानवर कारवाई करण्यात येईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायमूर्ती रॉनी अब्राहम यांनी आज, गुरुवारी दुपारी भारतीय वेळेनुसार साडेतीनच्या सुमारास कुलभूषण जाधव खटल्याचा निकालाचे वाचन सुरू केले. जाधव हे भारतीय नागरीक आहेत हे दोन्ही देशांनीही मान्य केले आहे. पण जाधव हे हेर आहेत की नाहीत हे अद्याप सिद्ध झालेले नाही, असे सांगून न्यायालयाने पाकिस्तानचा दावा अमान्य केला आहे. कोणत्याही देशांच्या नागरिकांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळाले पाहिजेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे. व्हिएन्ना करारानुसार जाधव यांना राजनैतिक मदत मिळाली पाहिजे. त्यांना कायदेशीर मदत मिळायला हवी, असे सांगून न्यायालयाने पाकिस्तानला एकप्रकारे झटकाच दिला. जाधव हे हेर आहेत किंवा नाहीत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे अंतिम निकाल येईपर्यंत पाकिस्तानला जाधव यांना फाशी देता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिला. न्यायालयाच्या आदेशांचे पालन करणे ही पाकिस्तानची जबाबदारी आहे. जर पाकिस्तानने न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असे सांगून न्यायालयाने पाकिस्तानला चपराक लगावली आहे.

तत्पूर्वी, पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. कुलभूषण जाधव यांच्या फाशीची शिक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी भारताने केली होती. सुनावणीदरम्यान दोन्ही देशांनी आपली बाजू न्यायालयात मांडली. जाधव यांना गेल्या वर्षी ३ मार्चला अटक करून हेरगिरी व विध्वंसक कारवायांच्या खोट्या प्रकरणात गोवण्यात आले. तसेच त्यांच्याकडून जबरदस्तीने जबाब घेण्यात आला, असा दावा भारताने न्यायालयात केला होता. भारताने जाधव यांच्याशी दूतावासामार्फत संपर्क साधण्याची विनंती सोळा वेळा केली होती. ती पाकिस्तानने फेटाळली होती. त्यामुळे व्हिएन्ना कराराचे उल्लंघन झाले असून, पाकिस्तानने मानवी हक्कांची पायमल्ली केल्याचा युक्तीवाद भारताने केला होता. तर जाधव हे हेर असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. पण जाधव हेर आहेत किंवा नाहीत हे अद्याप सिद्ध झालेले नाही, असे सांगून न्यायालयाने अंतिम निकाल येईपर्यंत जाधव यांना फाशी देता येणार नाही, असा निकाल दिला आहे. न्यायालयाचा हा निकाल म्हणजे भारताचा विजयच आहे, अशी प्रतिक्रिया सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे.