राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेवर टीका करत एकजिनसी राष्ट्राची संकल्पना अत्यंत धोकादायक आहे, असे मत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी व्यक्त केले. देशात ४६३५ प्रकारचे विविध समूह राहत असल्याने एकजिनसी राष्ट्र होणे अयोग्य आहे, असे त्यांनी सांगितले.
भारताच्या मानवशास्त्र विभागाच्या सर्वेक्षणानुसार देशात ४६३५ समूह आहे. विविधतेतून एकता ही या देशाची ओळख असून, या समूहांना एकसंध बांधणे ही गरज आहे, असे अन्सारी यांनी सांगितले. ‘इंडियन हिस्ट्री काँग्रेस’च्या ७५व्या अधिवेशानाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
आधुनिक काळात विविधतेमुळे गुंतागुंत आणि तणाव वाढत आहे, मात्र या समस्येवर मात करत आपली एकता टिकून ठेवणे हे कर्तव्य आहे. सर्व एकजिनसी समाजाला बांधून ठेवणे गरजेचे आहे, कारण विविधता हीच आपली ओळख आहे, असे अन्सारी यांनी सांगितले.