‘‘एखादी कल्पना सुंदर असेल तर त्याची अंमलबजावणी करण्यात काहीही अडचणी येत नाहीत. मात्र, कल्पना अथवा निर्णयच चुकीचा असेल, उदाहरणार्थ नोटाबंदीसारखा, तर मग अंमलबजावणी सदोष झाली, असे म्हणू नका. मला वाटते तुमची कल्पनाच चुकीची होती,’’ अशा शब्दांत दुचाकी वाहनांच्या निर्मितीत अग्रेसर असलेल्या बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर आसूड ओढले.

गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि एक हजाराच्या नोटा चलनातून बाद करत नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर देशभरात निर्माण झालेला चलनकल्लोळ ताजा आहे. यातून अद्याप देश सावरलेला नाही. नोटाबंदीच्या या निर्णयाचा फटका अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्रांना बसला. वाहन उद्योगही त्याला अपवाद ठरलेला नाही. या पाश्र्वभूमीवर येथे सुरू असलेल्या नॅसकॉम नेतृत्व परिषदेत बोलताना राजीव बजाज यांनी या निर्णयावर टीकास्त्र सोडले. दुचाकी वाहनांच्या विक्रीवर या निर्णयाचा परिणाम झाला आहे. उत्तम पाऊस आणि त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला आलेली तरतरी याच्या जोरावर दुचाकी खरेदी व्यवहार वाढतात. मात्र, नेमक्या याच कालावधीत नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम दुचाकी वाहनांच्या खपावर झाला. डिसेंबर महिन्यात बजाजच्या दुचाकी विक्रीत ११ टक्क्यांनी घट झाली.

नोटांची व्यवस्था पूर्ववत करण्याची प्रक्रिया पूर्ण

अर्थमंत्री अरुण जेटली यांचे प्रतिपादन

रांची : निश्चलनीकरणानंतर संपूर्ण भारतातील नोटांची व्यवस्था पूर्ववत करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. जुन्या नोटा पूर्णपणे बदलण्यात आल्या असून नव्या नोटा व्यवहारात आल्या आहेत.

नोटा बदलाची सर्व प्रक्रिया पार पडल्यामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडून नोटांची मागणी आणि पुरवठा यांच्यावर देखरेख करण्यात येत असल्याचेही जेटली यांनी स्पष्ट केले. दहशतवादी कारवाया, भ्रष्टाचार आणि काळा पैसा रोखण्यासाठी गतवर्षी नोव्हेंबरमध्ये केंद्र सरकारने जुन्या १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या सरकारकडून रोकडरहित अर्थव्यवस्थेसाठी प्रयत्न सुरू आहेत. झारखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स २०१७ या परिषदेच्यावेळी येथे उपस्थित असलेल्या जेटली यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. रोख अर्थव्यवस्थेमुळे गुन्हेगारी वाढण्याबरोबरच कर चुकवेगिरीचे प्रमाण वाढणार असल्याचेही ते म्हणाले. व्यापार आणि वाणिज्य विभागांमध्ये बदलाची गरज असून हे बदल झाले तरच अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असेही जेटली म्हणाले.