मुघल सम्राट बादशाह अकबर यांना जर महान संबोधण्यात येत असेल तर, महाराणा प्रताप यांना महान ठरविण्यात अडचण का यावी?, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी उपस्थित केला आहे.
प्रतापगड येथे महाराणा प्रताप यांच्या भव्य मुर्तीचे अनावरण राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शालेय अभ्यासक्रमात महाराणा प्रताप यांच्या योगदानाबद्दल पुरेशी माहिती देखील दिली जात नसल्याचे राजनाथ म्हणाले. इतिहासात योग्य ते बदल करण्याची गरज देखील त्यांनी बोलून दाखवली. अकबर महान होते याबाबत दुमत नाही मात्र, त्यांच्या बरोबरीने महाराणा प्रताप यांचेही योगदान तितकेच मौल्यवान आहे याची जाणीव ठेवायला हवी. राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात महाराणा प्रताप यांच्यावर माहितीचा धडा समाविष्ट करण्याबाबतच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या पुढाकाराचे कौतुक करत राजनाथ यांनी आपण केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याजवळ सीबीएसई अभ्यासक्रमात देखील महाराणा प्रताप यांचा धडा समाविष्ट करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.