भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद हे एनडीएचे राष्ट्रपतीपदासाठीचे उमेदवार असल्याचे सोमवारी दुपारी जाहीर केले. त्यांच्या या घोषणेनंतर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. रामनाथ कोविंद हे उत्तर प्रदेशमधील दलित समाजातून येतात. यासंदर्भात केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी याप्रकरणी खळबळजनक वक्तव्य केले आहे. रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीला पाठिंबा न देणारे दलित विरोधी समजले जातील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत कोविंद यांच्या नावाची घोषणा केली. त्या पार्श्वभूमीवर पासवान यांनी रामनाथ कोविंद यांना सर्वांनी पाठिंबा देण्याचे आवाहन केले. सर्वच पक्षांनी रामनाथ कोविंद यांना समर्थन द्यायला हवे. जो पक्ष त्यांना समर्थन करणार नाही तो दलित विरोधी समजला जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. शिवसेनेने दोन दिवसांत याबाबत पक्ष आपली भूमिका मांडेल असे स्पष्ट केले. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या सुपूत्राला सर्वच पक्षांनी राजकारणापलिकडे जाऊन मदत करण्याचे आवाहन केले. काँग्रेसने अजून काही निर्णय घेतला नसल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी माध्यमांना सांगितले.

रामनाथ कोविंद मुळचे उत्तरप्रदेशच्या कानपूरचे आहेत. कानपूरमधील पराऊंख गावात १ ऑक्टोबर १९४५ रोजी रामनाथ कोविंद यांचा जन्म झाला. कोविंद हे कोळी जातीचे असून उत्तर प्रदेशात या जातीचा समावेश अनुसूचित जातीमध्ये केला जातो.

पेशाने वकील असलेल्या कोविंद यांनी दिल्ली उच्च न्यायालयात काम केले आहे. त्यांनी १९७७ ते १९७९ या कालावधीत दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारचे वकील म्हणून कार्यरत होते. रामनाथ कोविंद यांनी १९९१ साली भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर तीनच वर्षांनी म्हणजेच १९९४ मध्ये कोविंद यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली. कोविंद भाजपकडून दोन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. १९९४ ते २००० आणि २००० ते २००६ हा कोविंद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ होता. अमित शहा यांनी राष्ट्रपती पदासाठीचे उमेदवार जाहीर करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वारंवार कोविंद यांच्या दलित असण्याचा उल्लेख केला.