भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आणखी कालावधी मिळाला असता तर काश्मीरचा प्रश्न मार्गी लागला असता, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. तसेच काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे स्थानिक जनता प्रक्षुब्ध झाल्याचेही भागवत यांनी कबूल केले. मात्र, ही जनता पाकिस्तानमध्ये जाऊ इच्छित नाही, असेही भागवत यांनी स्पष्ट केले. वाजपेयी सरकारने काश्मीरची समस्या जवळपास सोडविली होती. अटलबिहारी वाजपेयी यांनी संयम बाळगत हळूहळू काश्मीरमधील परिस्थिती मार्गावर आणली होती. आणखी एक-दोन वर्षे हीच परिस्थिती राहिली असती तर एव्हाना काश्मीरचा प्रश्न सुटला असता. मात्र, सरकार बदलले आणि धोरणेदेखील बदलली, असे भागवत यांनी सांगितले.
मोहन भागवतांनी दहा मुलांना जन्म देऊन दाखवावा- केजरीवाल
सध्याचे सरकार काश्मीरमध्ये असंतोष पसरवणाऱ्यांचा छडा लावण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. हे अशाचप्रकारे सुरू राहिले आणि जनतेनेही सरकारला पाठिंबा दिला तर काश्मीर एकटा नाही, संपर्ण भारत त्यांच्या पाठिशी आहे, हे पाकिस्तान बसून कट आखणाऱ्यांना कळेल, अशी पुस्तीही भागवत यांनी जोडली. यावेळी भागवत यांनी नरेंद्र मोदींनी गिलगिट आणि बलुचिस्तानसंदर्भात घेतलेल्या भूमिकेलाही पाठिंबा दर्शविला. काश्मीरचा काही भाग पाकिस्तान आणि चीनमध्ये विखुरला आहे. तो परत मिळवणे आवश्यक आहे आणि ती समस्याही सुटेल, असा विश्वास यावेळी भागवत यांनी व्यक्त केला. दरम्यान, काश्मीर खोऱ्यातील सध्याच्या परिस्थितीला वाईट प्रशासन कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले. इतका खर्च करूनही काश्मीरचा विकास झालेला नाही, रोजगार उत्त्पन झालेला नाही. ही सगळी प्रशासनाची जबाबदारी आहे. याशिवाय, गेल्या काही दिवसांत याठिकाणी जे काही घडले त्याच्यामुळे जनमत प्रक्षुब्ध झाले, याचा विचार होणे गरजेचे असल्याचे भागवत यांनी सांगितले.
‘हिंदूंचा प्रजननदर असाच कमी राहिला, तर त्यांचे अस्तित्त्वच संपेल’