भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीची बिहारमध्ये सत्ता आल्यास केंद्रातील सरकार ओबीसी, एस.सी. आणि एस.टी.साठी असलेले आरक्षण समाप्त करण्याची शक्यता आहे, असा आरोप बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला.
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या आरक्षण पुनर्मांडणीच्या वक्तव्याचा आधार घेऊन त्यांनी ही तोफ डागली.
खगारिया जिल्ह्य़ातील परबट्टा विधानसभा मतदारसंघातील प्रचारसभेत ते बोलत होते. बिहारमध्ये भाजप आघाडीला यश आल्यास केंद्रातील एनडीए सरकारला आरएसएसचा अजेंडा राबविण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि आरक्षण बंद केले जाईल, असा आरोप नितीश यांनी केला. आपली सत्ता आल्यास महिलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३५ टक्के आरक्षण दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारसाठी जाहीर केलेल्या विशेष पॅकेजवरही नितीश यांनी टीका केली. मोंदीच्या पॅकेजपेक्षा आपले व्हीजन डाक्युमेंट अधिक विशेष सुसंगत आणि उत्पन्नाचे स्रोत लक्षात घेऊन तयार केले आहे, असे नितीश म्हणाले. मोदी यांनी गेल्या महिन्यात नितीश यांच्या व्हीजन डाक्युमेंटवर टीका केली होती.