कच्छ प्रांताचा विकास होऊ शकतो, मग काश्मिरचा का नाही? असा सवाल उपस्थित करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आगामी काळात काश्मीर देशाची शान होईल, येथील सर्व समस्या सुटतील, असा ठाम विश्वास सोमवारी व्यक्त केला. श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर झालेल्या जाहीर सभेत मोदी बोलत होते. कच्छच्या विकासावर लक्ष केंद्रित केल्यापासून तो प्रांत विकासाच्या दिशेने प्रगती करू लागला आहे. काश्मीरमध्ये सुद्धा प्रगतीची उंची गाठण्याची ताकद आहे. निसर्ग संपन्न काश्मीर येथील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. येथे पर्यटनाची मोठी संधी आहे आणि त्याकडेच प्राधान्याने लक्ष देणार असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. या सभेत देखील मोदींनी ‘सबका साथ, सबका विकास’चा नारा देत विकासामुळेच येथील सर्व समस्या सुटतील, असे मत नोंदविले. तसेच भ्रष्टाचाराचा नायनाट केल्याने विकासाला चालना मिळेल, असेही ते पुढे म्हणाले.
स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजवर काश्मीरमधील जनतेचे संरक्षण करताना सैन्याचे जवान वगळून तब्बल ३० हजार पोलीस कर्मचारी शहीद झाले असल्याचा दाखला देत मोदींनी काँग्रेस सरकारला धारेवर धरले. गेल्या ३० वर्षांत काँग्रेसने काश्मीरला काय दिले? असा सवाल यावेळी मोदींनी उपस्थित केला. नुकत्याच झालेल्या सार्क परिषदेत देखील शेजारील राष्ट्रांना एकमेकांविरुद्ध लढण्यापेक्षा गरिबी, बेरोजगारी विरोधात एकत्र लढू, असे आवाहन केल्याचा उल्लेख यावेळी मोदींनी केला. काश्मीरमध्ये देखील पूर्ण बहुमताचे सरकार देऊन तुम्ही दिलेल्या प्रेमाची विकासाने परतफेड करण्याची संधी द्या, असे आवाहन मोदींनी केले.