‘भारत माता की जय’ म्हणण्याच्या मुद्द्यावरून सध्या देशात सुरू असलेल्या गदारोळामध्ये आता योगगुरू रामदेवबाबा यांनीही उडी घेतली आहे. जर देशामध्ये कायदा नसता, तर ‘भारत माता की जय’ न म्हणणाऱ्यां लाखो लोकांचा गळाच आपण कापला असता, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. जर कोणत्या धर्मामध्ये मातृभूमीचा आदर करा, असे शिकवत नसतील, तर तो धर्मच देशहिताचा नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रोहतकमध्ये सदभावना सभेचे आयोजन केले होते. त्यामध्ये रामदेवबाब प्रमुख पाहुणे उपस्थित होते. ते म्हणाले, कोणी एकजण टोपी घालून उठून उभा राहतो आणि म्हणतो ‘भारतमाता की जय’ नाही म्हणणार. हवे असेल तर माझा गळा कापा. या देशात कायदा आहे म्हणून, नाहीतर तुझ्या एकट्याचे का आम्ही तर लाखो लोकांचे गळे कापू शकलो असतो. पण आम्ही या देशातील कायद्याचा सन्मान करतो. नाहीतर कोणी भारतमातेचा अपमान केल्यावर एकाचे नाही तर अनेकांचे गळे कापण्यास आम्ही समर्थ आहोत.
‘भारतमाता की जय’ म्हणणे आमच्या धर्माच्या विरोधी असल्याचे काही संस्था म्हणतात, त्यावेळी  मला आश्चर्य वाटते, असे सांगून ते म्हणाले, आपल्या मातृभूमीचा गौरव करणे कोणत्याही धर्माच्याविरोधात नाही. तरीही जर कोणता धर्म असे म्हणत असेल तर तो धर्मच या देशाच्या हितामध्ये नाही, असे त्यांनी सांगितले.