योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच सरकारी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. सोमवारी योगी आदित्यनाथ यांच्या कामकाजाचा पहिला दिवस होता. यावेळी त्यांनी प्रधान सचिव आणि अन्य विभागातील अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली. तेव्हा त्यांनी उत्तर प्रदेशात धार्मिक तणाव पसरवणाऱ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. तसेच त्यांनी अधिकाऱ्यांना प्रामाणिकता, स्वच्छता आणि पारदर्शक कारभाराची शपथ घ्यायलाही लावली. यावेळी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांसमोर भाजपचा निवडणुकीपूर्वीचा जाहीरनामा ठेवला. या जाहीरनाम्यातील सर्व आश्वासने पूर्ण व्हायलाच पाहिजेत, अशी सक्त ताकीद त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. याशिवाय, सरकारी अधिकाऱ्यांना येत्या १५ दिवसांत स्वत:ची संपत्ती जाहीर करण्याचे आदेशही योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या माहितीनुसार, या बैठकीनंतर सरकारकडून एक आदेशही जारी करण्यात आला. यामध्ये गोहत्या, महिलांवरील अत्याचार आणि धार्मिक तणावाची परिस्थिती रोखण्यात अपयश आल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे. याशिवाय, उत्तर प्रदेशचे प्रधान सचिव देबाशीष पांडा आणि पोलीस महासंचालक जावेद अहमद यांनीदेखील पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना सामाजिक तणावाच्या घटना नियंत्रित करण्याचे निर्देश दिले आहेत.

योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर लगेचच उत्सवांच्या नावाखाली केला जाणारा उन्माद सहन केला जाणार नाही, अशी जाहीर भूमिका घेतली होती. अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे सामान्यांना त्रास होऊ नये, याची काळजी घेण्याचे आदेश आदित्यनाथ यांच्याकडून प्रशासनाला देण्यात आले होते.

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांचा सरकारी बंगल्यातील प्रवेशही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. उत्तर प्रदेशचे नवनियुक्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या सरकारी बंगल्यात विधिपूर्वक प्रवेश करण्यापूर्वी भगव्या वस्त्रधारी अनेक साधूंनी त्यांचा ‘पवित्र प्रवेश’ निश्चित करण्यासाठी सोमवारी या बंगल्याचा परिसर ‘शुद्ध’ करण्याची पूर्ण तयारी केली आहे. गोरखपूरचे पाच वेळा खासदार राहिलेले आणि गोरखनाथ पीठाचे महंत असलेले आदित्यनाथ यांनी रविवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विधिपूर्वक प्रार्थना आणि शुद्धीकरण झाल्याशिवाय आपल्या बंगल्यात प्रवेश न करण्याचे त्यांनी ठरवले आहे.
कडव्या हिंदुत्ववादाचे प्रतीक मानले जाणारे योगी आदित्यनाथ हे शुभमुहूर्तावरच या परिसरात प्रवेश करण्याची अपेक्षा आहे.गोरखपूर व अलाहाबाद येथील सात साधूंनी मुख्यमंत्र्यांच्या सरकारी बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ प्रार्थना केली. एका साधूने मुख्यमंत्र्यांच्या नामफलकावर चंदन व हळदीच्या लेपात बुडवलेल्या झेंडूच्या फुलाने ‘स्वस्तिक’ चिन्ह काढले. हिंदू परंपरेनुसार गृहप्रवेशाच्या प्रसंगी या चिन्हाचे विशेष महत्त्व आहे. या साधूने बंगल्याच्या दारांवर ‘ओम’ व ‘शुभ-लाभ’ ही अक्षरेही काढली. गृह प्रवेशाच्या वेळी लक्ष्मी व श्रीगणेशाची पूजा करण्याची ही नेहमीची प्रथा आहे, असे एका साधूने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.बंगल्याच्या आतील भागात साधूंनी यज्ञ आणि हवन करण्यासाठी पुरेपूर तयारी केली आहे.