पाकिस्तानच्या सीमेवरील नापाक कारवाया सुरुच राहिल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु, असे विधान लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी केले. ‘पाकिस्तानला योग्य तो संदेश देण्यासाठी गेल्या वर्षी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता. मात्र पाकिस्तानने सीमेवरील कुरापती कमी न केल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात येईल,’ असे रावत म्हणाले. गेल्या वर्षी भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला एक वर्ष पूर्ण होत आहे.

‘पाकिस्तानच्या सीमावर्ती भागातील कारवाया कमी न झाल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात येईल. मात्र अशा प्रकारची लष्करी कारवाई करण्यासाठी इतरही मार्ग उपलब्ध आहेत. त्यामुळेच पुन्हा गेल्या वर्षीसारखीच कारवाई केली जाण्याची शक्यता नाही,’ असे लष्करप्रमुखांनी म्हटले. यावेळी त्यांना पाकिस्तानकडून वारंवार होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि घुसखोरीचे प्रयत्न याबद्दल विचारण्यात आले. यावर बोलताना ‘त्यांना (दहशतवाद्यांना) येत राहू दे, त्या सगळ्यांना जमिनीत गाडू,’ असे ते म्हणाले.

‘देशहित लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेऊ. यात आम्ही सक्षम आहोत,’ असे रावत यांनी म्हटले. आपल्या देशात इतिहासाचा लवकर विसर पडतो. इतिहासातील नोंदी आपल्याकडे जपल्या जात नाहीत, असे म्हणत त्यांनी मनातील खंत व्यक्त केली. ‘भविष्यात जवानांच्या कामगिरीची दखल घेतली जाईल आणि त्यांच्या शौर्यकथांचा समावेश शालेय पुस्तकांमध्ये होईल, अशी आशा वाटते,’ असेही ते म्हणाले.

गेल्या वर्षी २९ सप्टेंबरला भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. या धाडसी कारवाईत जवानांनी दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले. भारतीय लष्कराच्या या धाडसी कारवाईने दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले. पाकिस्तानमधून आलेल्या दहशतनाद्यांनी १८ सप्टेंबरमध्ये जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर हल्ला केला होता. या हल्ल्यात लष्कराच्या १९ जवानांना प्राण गमवावा लागला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक केला होता.