काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांची विमानतळावर भाजप आमदार गणेश जोशी यांच्याशी शाब्दिक चकमक उडाली. डेहराडून विमानतळावर हे दोघे आमने सामने आले होते. शेवटी पोलिसांनी गणेश जोशी आणि त्यांच्या समर्थकांना विमानतळाबाहेर काढले आणि वाद संपुष्टात आला.
पाच महिन्यांपूर्वी उत्तराखंडमधील भाजप आमदार गणेश जोशी यांनी डेहराडून पोलिसांच्या शक्तिमान या घोड्याला क्रूरपणे मारहाण केली होती. या मारहाणीनंतर शक्तिमानचा मृत्यू झाला होता. रविवारी रॉबर्ट वढेरा हे काही कामानिमित्त उत्तराखंडमध्ये आले होते. स्वगृही परतण्यासाठी ते डेहराडून विमानतळावर आले होते. तर भाजप आमदार गणेश जोशी हे एका भाजप खासदाराच्या स्वागतासाठी विमानतळावर आले होते. या दरम्यान दोघेही आमने सामने आले आणि दोघांमध्येही शक्तिमान घोड्याला मारहाण केल्यावरुन शाब्दिक चकमक झाली. गणेश जोशी मला विमानतळावर दिसले. मला त्यांच्या विषयी काय वाटते हे मी त्यांना सांगितले. माझे बोलणे ऐकून ते ओरडत माझ्या अंगावर धावून आले असे वढेरा यांनी म्हटले आहे. शक्तिमान घोडा काही बोलू शकला नाही, पण मी गप्प बसणार नाही असेही त्यांनी सांगितले.
गणेश जोशी यांनी या वादावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मार्च महिन्यात एका निषेध मोर्चाच्या वेळी गणेश जोशी यांनी पोलिसांच्या शक्तिमान या घोड्याला मारहाण केली होती. याप्रकरणी त्यांना अटकही झाली होती. तेव्हापासून गणेश जोशी हे सातत्याने चर्चेत आहेत. शक्तिमान या घोड्याच्या स्मृतीप्रित्यर्थ डेहराडुनमध्ये स्मारकही करण्यात येणार होता. शक्तिमानचा पुतळादेखील लावण्यात आला. मात्र त्यानंतर हा पुतळा हटवण्यात आला होता.