जर सव्वाशे कोटी भारतीयांनी देशासाठी चांगले काहीतरी करण्याचा निश्चय केला तर २०२२ पर्यंत देश १२५ कोटी पावले पुढे जाईल, देश तेव्हा स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण झाल्याचा महोत्सव साजरा करीत असेल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला प्रोत्साहीत केले. सीमेवरील गुरेज सेक्टरमध्ये जवानांसोबत संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि मिठाईचे देखील वाटप केले. त्यांच्यासोबत लष्करप्रमुख बिपीन रावत हे देखील उपस्थित होते.


मोदी म्हणाले, मला आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करायची होती. त्यामुळे आज तुमच्याकडे आलो आहे. पंतप्रधानांनी यापूर्वी २०१४ मध्ये सियाचिनमध्ये, २०१५ मध्ये पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर, २०१६ मध्ये हिमाचल प्रदेशातील चीन सीमेवरील किनौर भागात जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.

मोदी म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मोठ्या कष्टाने आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे आता देशासाठी आपण आणखी वेगळे काहीतरी करू शकतो का? याचा विचार प्रत्येक भारतीयाने करायला हवा. त्यासाठी तुम्ही एखादे तंत्रज्ञ किंवा अभियंता असण्याची गरज नाही, तुमचे कौशल्य तुम्ही दाखवायला हवे, असे आवाहन त्यांनी यावेळी जवानांना केले. यासाठी एका जवानाने आपल्या कामाच्या गरजेप्रमाणे केलेल्या संशोधनाचा दाखलाही त्यांनी दिला. या अशा संशोधनांचा वापर देशाचे लष्कर, सीआरपीएफ, बीएसएफ या सुरक्षा दलांमध्ये होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. अशा संशोधनांद्वारे आपण मिळून आपल्या अडचणी सोडवण्याबरोबरच गरजा पूर्ण करायला हव्यात असे त्यांनी सांगितले.