आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे अजब विधान

‘आमचे तेलगू देसमचे सरकार आंध्र प्रदेशातील ज्या लोकांना आवडत नसेल त्यांनी राज्य सरकारचे निवृत्तिवेतन घेऊ नये, तसेच सरकारने बांधलेल्या रस्त्यांवरून त्यांनी चालू नये,’ असे अजब विधान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी गुरुवारी केले.

कुर्नुल जिल्ह्य़ातील नांद्याल येथे पक्षाच्या एका कार्यक्रमात नायडू बोलत होते. आपले सरकार राज्यातील जनतेसाठी खूप कामे करीत आहे. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन मतांची मागणी करावी. मत देण्यास मतदार तयार नसतील तर, तुमच्यासाठी इतके करून आम्हाला मत का देत नाही, असा जाब त्यांना विचारावा, असा सल्ला नायडू यांनी दिला. आम्ही बांधलेल्या रस्त्यांवरून तुम्ही चालणार.. आमचे सरकार देत असलेले निवृत्तिवेतन तुम्ही घेणार, आणि मत मात्र आम्हाला देणार नाही, असे कसे चालेल, असे उद्गार त्यांनी काढले. एखाद्या खेडय़ातून आपल्याला मते मिळाली नसल्याचे लक्षात आले तर त्या खेडय़ाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यासही मी मागेपुढे पाहणार नाही, असे धक्कादायक विधानही त्यांनी केले.