धर्मांतर आवडत नसेल तर ते रोखण्यासाठी संसदेत धर्मांतरबंदीचा कायदा आणा, असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी धर्मांतरावरुन सुरू असलेल्या वादात उडी घेतली. तुम्हाला जर धर्मांतर आवडत नसेल तर त्याविरोधात कायदा आणावा, असे आव्हान त्यांनी विरोधकांना केले. ते शनिवारी कोलकता येथील एका कार्यक्रमात बोलत होते. धर्मांतरावर बंदी आणणारा कायदा आणल्यास सध्या सुरू असलेल्या वादाला लगाम बसेल. तुम्हाला हिंदू धर्मात यायचे नसेल तर, तुम्ही धर्मांतर करून घेऊ नका, असेही त्यांनी यावेळी म्हटले. मात्र, जे लोक भरकटून हिंदू धर्माबाहेर गेले आहेत, त्यांना परत आणणे आमचे कर्तव्य असल्याचे भागवत यांनी यावेळी सांगितले. हिंदू समाज जागृत होत असून, आता आपल्याला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. पाकिस्तान ही देखील भारताचीच भूमी आहे. मात्र, १९४७ झालेल्या काही घटनांमुळे हा भाग भारतापासून वेगळा झाला. हिंदू समाजाने काही इतर देशातून भारतात घुसखोरी केलेली नाही. हे आमचे हिंदुराष्ट्र असल्याचे विधानही भागवत यांनी केल्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 
दरम्यान, भागवत यांच्या वक्तव्यावर टीका करताना काँग्रेस नेते राशीद अल्वी यांनी भरकटलेले लोक म्हणून भागवतांना नक्की कोणते लोक अभिप्रेत आहेत, याचे उत्तर देण्याची मागणी केली. भरकटल्यामुळे भारतापासून पाकिस्तान वेगळा झाला. तेव्हा भागवत यांनी सर्वप्रथम त्यांना परत आणावे, असा सल्ला रशीद अल्वी यांनी भागवतांना दिला आहे.