डाटा हॅक केल्याप्रकरणी ‘आधार प्राधिकरणाने’ (युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया- यूआयडीएआय) बंगळुरु पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आयआयटी खरगपूरमधून पदवी घेतलेल्या एका इंजिनीअरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे ‘आधार’मधील गोपनीयतेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

‘यूआयडीएआय’च्या अधिकाऱ्यांनी बंगळुरु पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. आयआयटी खरगपूरमधून इंजिनीअर झालेला अभिनव श्रीवास्तव आणि त्याच्या क्वार्थ टेक्नोलॉजी या कंपनीने १ जानेवारी २०१७ ते २६ जुलै २०१७ या कालावधीत अवैधरित्या आधारचा डाटा मिळवला असे तक्रारीत म्हटले आहे. या डाटाचा वापर त्यांनी ‘ई-केवायसी व्हेरिफिकेशन’ या अॅपसाठी केला होता.
विशेष म्हणजे अभिनव श्रीवास्तवच्या कंपनीने यापूर्वी एक्स- पे हा मोबाईल पेमेंट अॅपही तयार केला होता. मार्च २०१७ मध्ये ‘ओला’ने हा अॅप विकत घेतला होता. २०१२ मध्ये अभिनव आणि त्याचा वर्गमित्र प्रीत श्रीवास्तव या दोघांनी ‘क्वार्थ’कंपनी सुरु केली होती. २००४ ते २००९ या कालावधीत हे दोघे आयआयटी खरगपूरमध्ये शिक्षण घेत होते. आधारचा डाटा हॅक करु शकणाऱ्या किंवा डाटा कसा मिळवायचा याची माहिती असलेल्या मंडळींची श्रीवास्तवने मदत घेतली असावी अशी शक्यता आहे. गेल्या वर्षी ‘ई-केवायसी’ हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध झाले होते. मात्र याप्रकरणात तक्रारी येताच गुगल प्ले स्टोअरवरुन अॅप काढून टाकण्यात आले होते. सरकारचे अधिकृत अॅप नसताना या अॅपवर आधार कार्डविषयीची माहिती, जन्मतारिख ही माहिती कशी मिळू शकते असा सवाल काही युजर्सनही उपस्थित केला होता.

‘यूआयडीएआय’च्या दिल्लीतील अधिकाऱ्यांनी यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र आधारचा सर्व्हर हॅक करणे अशक्य आहे. ही माहिती अन्य मार्गांनी मिळवण्यात आली असावी असे अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. आधार कार्ड सक्तीच्या निमित्ताने खासगीपणाचा अधिकार हा मूलभूत हक्क आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात सुप्रीम कोर्टात नऊ सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणी सुरु असतानाच हे प्रकरण समोर आले आहे.