तोट्यात असलेल्या ‘एअर इंडिया’ या सरकारी विमान कंपनीने मुंबईतील काही स्थावर मालमत्ता विक्रीसाठी काढली आहे. यामध्ये विविध ठिकाणच्या ४१ फ्लॅट्सचा समावेश आहे. एअर इंडियाने यासंदर्भात काढलेल्या परिपत्रकानुसार, आपल्या मालमत्ता विकून कंपनी पैसा उभा करणार आहे. या प्रक्रियेद्वारे ‘एअर इंडिया’च्या खासगीकरणालाच आता सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.

एअर इंडियाच्या मालकीच्या मुंबईत अनेक स्थावर मालमत्ता आहेत. यामध्ये मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनी आणि इमारती आहेत. त्याचबरोबर मुंबईत कंपनीचे ४१ फ्लॅट्स आहेत. हे फ्लॅट्सही कंपनीने विक्रीसाठी काढले आहेत. यांमध्ये दोन बेडरूम आणि तीन बेडरूमच्या अनेक फ्टॅट्सचा समावेश आहे. एअर इंडियाची या मालमत्तांच्या विक्रीला मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्राथमिक मंजूरी मिळाली आहे. यानंतर यासंदर्भात अंतिम निर्णय मंत्रीमंडळाकडून लवकरच जाहीर केला जाणार आहे.

यापूर्वीच्या युपीए सरकारने एअर इंडियाला बुडण्यापासून वाचवण्यासाठी तब्बर ३० हजार कोटींचे ‘बेलाऊट पॅकेज’ दिले होते. त्यांनतर कंपनी २०१५-१६ मध्ये पहिल्यांदाच या दशकात ऑपरेशनली फायद्यामध्ये होती. या वर्षात कंपनील १०५ कोटींचा नफा झाला होता.

सध्या एअर इंडियावर ५० हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे. सरकारने नुकतेच, संसदीय स्थायी समितीसमोर सांगितले होते की, एअर इंडियाचा सध्याचा व्यवसाय हा टिकण्याच्या अवस्थेत नाही. यामध्ये फायदा होण्याइतपत क्षमता राहिलेली नाही. तसेच यातून पैशाची निर्मिती तर होणार नाहीच. तसेच, यापासून कंपनीवरील कर्जातील मुद्दलही निघू शकणार नाही.

मे महिन्यांत यासंदर्भात सरकारला दिलेल्या अहवालानुसार, निती आयोगाने यासाठी मालमत्ता विकून तोटा भरून काढण्याचा पर्याय समोर ठेवला आहे. त्यासाठी कंपनीच्या मालकीचे विविध भूखंड विकण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्याचबरोबर हवाई उद्योग हा सरकारसाठी प्राध्यान्याचा विषय होऊ शकत नाही. यामध्ये सरकारने पैसा गुंतवण्याची गरज नाही, असे निरीक्षणही निती आयोगाने नोंदवले आहे.

निती आयोगाच्या या अहवालानंतर २८ जून रोजी केंद्रीय मंत्रीमंडळाने एअर इंडियाची मालमत्ता विक्रीसाठी प्राथमिक स्वरूपात मंजूरी दिली आहे.