लडाखजवळील देपसांग खोऱ्यात आपण गेल्या वर्षी घुसखोरी केली असल्याची कबुली चीनने गुरुवारी प्रथमच दिली. मात्र, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा निश्चित कोठे आहे, यासंबंधी संभ्रम झाल्यामुळेच ही घुसखोरी झाली असावी, अशीही पुस्ती जोडण्यास चीन विसरलेला नाही. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने (‘पीएलए’) यासंबंधी हे स्पष्टीकरण दिले.
गेल्या वर्षी उभय देशांच्या सीमेवर काही गोष्टी घडल्या, मात्र नंतर वाटाघाटींच्या माध्यमातून सर्व बाबींचे योग्य रीतीने निराकरणही करण्यात आल्याची माहिती चीनच्या लष्कराचे प्रवक्ते कर्नल जेंग यानशेंग यांनी दिली. यानशेंग यांनी देपसांगचा थेट उल्लेख केला नाही.
गेल्या वर्षी देपसांगवरच कब्जा करण्याच्या हेतूने चिनी सैन्याने त्या परिसरात तंबूही ठोकले होते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेची दोन्ही बाजूंनी नेमकी आखणी झालेली नाही आणि त्यामुळे त्याबद्दल दोन्हीकडे वेगवेगळे मतप्रवाह असल्याचाही दावा यानशेंग यांनी केला. परदेशी पत्रकारांसमवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चीन आणि चीनचे लष्कर यासंबंधी अधिक चांगली आणि वस्तुनिष्ठ माहिती बाहेर कळावी, यासाठी परदेशी माध्यमांना आमंत्रित करण्यात आल्याचे यानशेंग यांनी सांगितले.
गेल्या वर्षी, चीनचे पंतप्रधान ली केक्विआंग यांनी मे महिन्यात भारतास भेट दिली, त्याआधी देपसांग खोऱ्यात घुसखोरीची घटना घडली होती. त्यामुळे लष्करी आणि राजनैतिक स्तरावर तणावही निर्माण झाला. मात्र, वाटाघाटींच्या अनेक फेऱ्या पार पडल्यानंतर चिनी सैनिक तेथून माघारी आले, असे यानशेंग यांनी स्पष्ट केले.
सीमावाद इतिहासजमा
केक्विआंग हे चीनच्या पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर प्रथमच त्यांनी भारताचा दौरा आखलेला असतानाच भारतभेटीआधी चिनी सैन्याने देपसांग भागात घुसखोरी का केली, यासंबंधी चीनकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते. त्यानंतरही लडाख भागात चीनची घुसखोरी झाली, परंतु त्यावर एकमताने तोडगा काढण्यात आला. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंबंधी भिन्न समजुती असल्यामुळे अशा घटना घडत असतात, असा सूर यानशेंग वारंवार आळवत होते. भारत आणि चीन यांच्यातील सीमावादाचा मुद्दा आता इतिहासजमा झाला आहे, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.