चीनच्या घटत्या जनसंख्येच्या संकटावर मात करण्यासाठी चीनी सरकारने सुरू केलेल्या दोन अपत्याच्या योजनेला चीनमधील नागरिकांकडून थंड प्रतिसाद मिळतो आहे. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या या देशातील ६० टक्के नोकरदार वर्गातील महिलांना दुसरे अपत्य नको आहे. चीनमधील नोकरीसंबंधीचे संकेतस्थळ ‘झाओपिन डॉट कॉम’ने ‘मदर्स डे’च्या आधी प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार चीनमधील ६० टक्के मातांना दुसरे अपत्य नको असल्याची माहिती समोर आली आहे. या संकेतस्थळाने एकूण १४२९० नोकरदार महिलांचे त्यांच्या कामाविषयी आणि जीवनातील पसंतीबाबतचे सर्वेक्षण केले. अद्याप मातृत्व प्राप्त न झालेल्या २९.३९ महिलांपैकी २०.४८ टक्के महिलांनी आपल्याला मुलबाळ नको असल्याचे मत व्यक्त केल्याचे या अहवालाचा हवाला देत सरकारी वृत्तपत्र ‘चायना डेली’ने या संबंधीच्या वृत्तात म्हटले आहे. मुलबाळ नको असण्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना, मुलांच्या पालन-पोषणाचा खर्च चिंतेचा विषय असल्याचे उत्तर ५६ टक्क्यांपेक्षा अधिक महिलांनी दिले. त्याशिवाय त्यांच्या पालन-पोषणासाठी द्यावे लागणारे लक्ष, वेळ आणि उर्जा याबाबतची चिंतादेखील त्यांनी व्यक्त केली. नोकरीतील अस्थिर वातावरण, गर्भारपण अथवा प्रसव क्रियेतील गुंतागुत आणि लग्नसंस्थेवरील ढासळता विश्वास या कारणांचादेखील यात समावेश आहे. मातृत्वासाठी आपण नोकरी सोडणार नसल्याचे ७० टक्क्यांपेक्षा अधिक महिलांनी सांगितले. तर १८.५३ टक्के महिलांनी आपण याबाबत विचार करू असे सांगितले.
संपूर्णपणे पतीच्या उत्पन्नावर जीवन व्यतित करणे संभव नसल्याचे अनेक नोकरदार महिलांचे मानणे आहे. याशिवाय महिलांमध्ये असलेली महत्वाकांक्षा हे देखील एक कारण आहे. नोकरी सोडल्यास सध्याच्या गतीमान युगात एकाकी पडून करिअरच्या संधी हरवून बसू अशी महिलांना भीती असल्याचे झाओपिनचे वरिष्ठ अधिकारी वान यिक्सिन यांनी सांगितले.