पन्नास कोटी डॉलर्सचा प्रकल्प
प्राण्यांचे क्लोनिंग करणारे सर्वात मोठे केंद्र पुढील वर्षी ईशान्य चीनमधील तियानजिन येथे सुरू होत आहे. एक प्रकारे तो प्राण्यांचा कारखानाच ठरणार आहे. बोयालाइफ या चिनी तर सुआम बायोटिक या दक्षिण कोरियाची प्राण्यांच्या क्लोनिंगमध्ये मक्तेदारी असून प्राण्यांचे मांस जास्त प्रमाणात मिळावे, यासाठी क्लोनिंग तंत्राने गायीम्हशींचे गर्भ तयार करून त्यापासून त्यांची निर्मिती केली जाणार आहे. याशिवाय स्निफर कुत्रे, शर्यतीचे घोडे व इतर प्राण्यांचे क्लोनिंगही केले जाणार आहे. या प्रकल्पाची किंमत ५० कोटी डॉलर्स असेल. यात प्रयोगशाळा, जनुकपेढी व संग्रहालय यांचा समावेश आहे. क्लोनिंग केलेल्या प्राण्यांचे मांस खाण्यास कितपत सुरक्षित असेल याबाबत प्रश्नच आहे.
बोयालाइफचे मुख्य कार्यकारी अधिकारी झू शियाओचून यांनी सांगितले, की या तंत्रज्ञानाबाबत लोकांना अनेक शंका आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा लागेल. १९ नोव्हेंबर २०१५ रोजी जनुकसंस्कारित सामन माशाच्या प्रजातीस खाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. अ‍ॅक्वाबाउंटी टेक्नॉलॉजीज या कंपनीने हा मासा तयार केला होता. चिनी वैज्ञानिकांनी मानवी भ्रूणाचे जनुक संपादनही केले होते. २३ एप्रिल २०१५ रोजी हा प्रयोग केला असता त्यावर चिंता व्यक्त करण्यात आली होती. गेल्या महिन्यात दक्षिण कोरियातील सोल येथे हाँग वू सक यांनीही असाच प्रयोग केला आहे. ओरेगॉन आरोग्य व विज्ञान विद्यापीठाने मानवी गर्भ त्वचापेशीपासून तयार केले आहेत, त्यात त्वचेच्या मूलपेशी दात्याच्या अंडपेशीत टाकण्यात आल्या व त्यातून गर्भाची निर्मिती करण्यात आली. झू यांच्या मते क्लोनिंग तंत्रज्ञान नवीन नाही. पण प्रत्येकाला त्याबाबत माहिती नाही, चीनमध्ये ज्या स्ट्रॉबेरी व केळी विकली जातात ती जनुकसंस्कारित आहेत. संत्र्यांच्या एका पेल्यातील रस दुसऱ्या पेल्यात ओतण्यासारखेच हे आहे. म्हणजे मूळ प्राणी व क्लोनिंग केलेला प्राणी किंवा वनस्पती यात काही फरक नसतो. काही लोकांना क्लोनिंग किंवा जनुकसंस्कारित अन्नाची भीती वाटते. चीनमध्ये लहान बाळांच्या अन्नपदार्थात मेलॅमाइन सापडले होते, त्यामुळे तेथे अशा अन्नपदार्थाबाबत खूपच साशंकता व्यक्त केली जाते. चीनमध्ये क्लोनिंग केलेल्या प्राण्यांच्या मांस विक्रीबाबत नकारात्मक प्रतिक्रिया आहेत, असे मांस प्रथम नेत्यांना खाऊ घाला असे त्यांचे म्हणणे आहे. मुळात म्हणजे हा क्लोनिंग प्रकल्प तिआनजिन येथे होत आहे, तेथे ऑगस्टमधील स्फोटात १७३ जण ठार झाले होते. त्यामुळे तेथे असा प्रकल्प राबवणे मुळातच चुकीचे आहे असे काहींचे म्हणणे आहे. हाँग वू सूक हे कोरियन भागीदार यात असून त्यांनी यापूर्वी मानवी गर्भाचे क्लोनिंग केले असून त्यातील मूलपेशी काढल्या आहेत. ते बोयालाइफ कंपनीबरोबर भागीदार आहेत. १९९६ मध्ये डॉली ही मेंढी क्लोनिंग तंत्राने स्कॉटलंड येथे तयार करण्यात आली. त्यानंतर चीनमध्ये गायी, डुकरे यांचे क्लोनिंग करण्यात आले. अमेरिकेत पाळीव प्राण्यांच्या क्लोनिंगला परवानगी आहे पण सप्टेंबरमध्ये युरोपीय समुदायाने प्राण्यांच्या क्लोनिंगवर बंदी घातली आहे. चीन कृषी विद्यापीठाच्या प्रा झू यी यांनी सांगितले, की क्लोनिंग तंत्राने चीनला प्राण्यांची आयात करावी लागणार नाही. मांसाची वाढती मागणीही पूर्ण करता येईल पण तो शाश्वत तोडगा नाही. झू यांना क्लोनिंग तंत्राने प्राण्याची निर्मिती करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागणार आहे.