भाजपचे नेते व चित्रपट अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या भाजपशी निष्ठेबाबत शंका निर्माण झाल्या आहेत, मात्र आपण भाजपशी एकनिष्ठ आहोत पण भविष्यात आपल्यासाठी काय वाढून ठेवले आहे हे माहीत नाही, असे सिन्हा यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आपण काल रात्री नितीशकुमार यांची भेट घेतली, त्यांच्याशी आपली व्यक्तिगत मैत्री व संबंध आहेत. आम्ही नेहमीच भेटतो मग आताच्याच भेटीची चर्चा कशासाठी हे समजत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहार दौऱ्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी नितीशकुमार यांची भेट घेतली होती. ते पाटणासाहिब मतदारसंघातील भाजपचे खासदार आहेत. नितीशकुमार हे मोठय़ा भावासारखे आहेत व त्यांना आपण पाटण्यात एकदा तरी भेटतोच. दरम्यान मंत्रिमंडळात समावेश न केल्याने शत्रुघ्न सिन्हा नाराज असल्याचे समजते. लोक राईचा पर्वत करीत आहेत असे सांगून त्यांनी नितीशकुमार यांच्या केलेल्या स्तुतीचे समर्थन केले. नितीशकुमार हे बुद्धिमान व पात्र मुख्यमंत्री आहेत व आपण बिहारी बाबू आहोत असे सिन्हा म्हणाले. उद्याचे आपल्याला माहिती नाही कदाचित पक्षाने आपल्याला बाहेर काढले व दुसऱ्या पक्षाने घेतले तर आपल्याला त्याबाबत काही सांगता येत नाही.