पंजाबच्या गुरदासपूर मतदारसंघात झालेल्या भाजपच्या पराभवावर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी सोशल मीडियावरून काँग्रेसला शुभेच्छा दिल्या असून अपेक्षेप्रमाणे गुरूदासपूर पोटनिवडणुकीत सुमारे २ लाख मतांच्या अंतराने भाजपचा अपमानजनक पराभव झाला, असे ट्विट केले.

पराभव अपेक्षितच होता, कारण लोकप्रिय दिवंगत खासदार विनोद खन्ना यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली नाही, असे ते म्हणाले. गुरदासपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या सुनील जाखड यांनी भाजपचे स्वर्णसिंग सलारिया यांचा सुमारे २ लाखांच्या मतांच्या फरकाने पराभव केला आहे.

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मिळालेल्या या विजयामुळे काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. जीएसटी निर्णयाविरोधातील जनतेची ही प्रतिक्रिया असल्याची काँग्रेसचे म्हणणे असून याविरोधात त्यांच्याकडून देशभरात तीव्र आंदोलन करण्याची शक्यता आहे. विनोद खन्ना यांचे निधन झाल्यामुळे या मतदारसंघात निवडणूक लागली होती.

पक्षाने या पराभवाचे आत्मपरीक्षण करावे. आम्ही आमचा पराभव स्वीकारतो आणि जाखड यांना शुभेच्छा देतो. योग्य वडिलांचा योग्य मुलगा असे म्हणत या मतदारसंघात नवज्योतसिंग सिद्धूंचा मोठा प्रभाव दिसून आल्याचे ते म्हणतात. आम्हाला खरच आरसा पाहण्याची गरज आहे. भिंतीवर लिहिलेल्या गोष्टी पाहा आणि लोकांच्या मूडचा अंदाज लावा, असे ट्विटही त्यांनी केले.

यापूर्वीही शत्रुघ्न सिन्हा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी पाटणा विद्यापीठाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले. पण त्यांना निमंत्रण नसल्याने नाराजीही व्यक्त केली होती. त्याचबरोबर सध्या सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात भुमिका घेतलेले माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांना समर्थनही दिले होते. त्यामुळे पक्षातील काही नेते त्यांच्यावर नाराज आहेत. यापूर्वीही त्यांनी अशी नाराजी ओढावून घेतली होती.