पंतप्रधानांचे आवाहन; महाराष्ट्राच्या जलयुक्त शिवार योजनेचे ‘मन की बात’मधून कौतुक
सध्याची उष्णतेची तीव्र लाट व पर्यावरणाचा होणारा ऱ्हास पाहता वनसंपदा वाचवण्यासाठी जनचळवळ गरजेची असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. पावसाळ्यादरम्यान पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी नभोवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमात केले. दुष्काळाला तोंड देण्याबाबत महाराष्ट्राने केलेल्या उपाययोजनांचे पंतप्रधानांनी कौतुक केले.
निरोगी आयुष्यासाठी योगाचे महत्त्व पटवून देत, २१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त चंदीगढ येथे होणाऱ्या समारंभात सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वनसंपदा कमी होत असल्याने जीवनावर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत. त्यातून प्राणीही सुटलेले नाहीत. हे असेच सुरू राहिले तर आपण विनाशाच्या मार्गाकडे जाऊ असा इशारा त्यांनी दिला.
उत्तराखंड, हिमाचल प्रदेश व जम्मू आणि काश्मीरमध्ये नुकत्याच जंगलांना लागलेल्या आगीचा संदर्भ देत, यात निष्काळजीपणाचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. जंगले वाचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
दुष्काळ हा राजकीय मुद्दाच नाही. राज्यात सरकार कोणतेही असो, या मुद्दय़ावर कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे. दुष्काळाचा सामना करत असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केल्यावर अनेक बाबी शिकायला मिळाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
सिंचनाबाबत जलयुक्त शिवारसारख्या महाराष्ट्राच्या योजनेचे पंतप्रधानांनी कौतुक केले. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेशचाही त्यांनी उल्लेख केला. त्यामुळे प्रतिवर्षी २-३ लाख हेक्टर अधिक जमीन ओलिताखाली येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आत्मविश्वास गमावू नका
असंतोष निर्माण झाल्यास अपयश येते. गुण कमी मिळाले म्हणून आयुष्य संपत नाही. महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वास गमावू नका. दोन पालकांचे त्यांनी उदाहरण दिले. आपल्या पाल्याला ८९ टक्के गुण मिळाले तरी त्यांचे समाधान झाले नाही. थोडक्यात अपेक्षांचे ओझे लादू नका अशी अप्रत्यक्ष सूचनाही केली. आगामी रिओ ऑलिंपिकमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांना प्रोत्साहन देण्याची सूचना त्यांनी केली. निकाल काहीही असो, इच्छाशक्ती प्रबळ हवी.

काळा पैसा रोखण्याचा प्रयत्न
आधुनिक समाजनिर्मितीसाठी अधिक पारदर्शीपणे काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्या संदर्भात सरकारच्या उपाययोजनांची माहिती पंतप्रधानांनी दिली. यामध्ये काळ्या पैशाचा प्रभाव रोखण्यासाठी रोकडरहित (कॅशलेस) व्यवस्थेची कल्पना त्यांनी स्पष्ट केली. यामध्ये जनधन, आधार व मोबाईल फोन बँकिंगच्या मदतीने खरेदीवेळी पैसे देण्यासाठी अशी व्यवस्था करून काळ्या पैशाला आळा घालता येईल असे त्यांनी सुचवले.
पावसाळ्यात पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा. त्याची तयारी आतापासूनच करा. हे केवळ सरकार किंवा राजकारण्यांचे काम नाही, तर सामान्य जनतेने पुढाकार घ्यायला हवा. त्याला माध्यमांनीही सहकार्य करावे.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान