राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) जुना भिडू असणारे नितीश कुमार लवकरच स्वगृही परतणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काल दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी नितीश कुमार यांची भेट घेतली. त्यानंतर आज ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी या भेटीबद्दलची माहिती दिली. यावेळी अमित शहा यांनी नितीश यांच्या जनता दलाला (संयुक्त) भाजपप्रणित रालोआ आघाडीत सामील होण्याचे निमंत्रण दिले.

काही दिवसांपूर्वीच नितीश कुमार यांनी लालूंच्या राष्ट्रीय जनता दल आणि महाघाडीसोबतचा डाव मोडून भाजपशी हातमिळवणी केली होती. त्यानंतर भाजप आणि ‘एनडीए’तील अन्य घटकपक्षांच्या साथीने ते पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले होते. यानंतर ‘जदयू’च्या प्रवक्त्यांकडून एनडीएत सामील होण्याचे संकेत देण्यात आले होते. अखेर अमित शहा यांनी नितीश कुमारांची भेट घेतल्यानंतर जदयूला एनडीएत सामील होण्याचे अधिकृत निमंत्रण दिले. तत्पूर्वी अमित शहा यांनी बिहारमधील केंद्रीय मंत्री आणि खासदारांशी संवाद साधून तेथील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, महाआघाडीची साथ सोडल्यानंतर नितीश काल पहिल्यांदाच दिल्लीत आले होते.

‘शरद यादव त्यांचा निर्णय घ्यायला मोकळे आहेत’

दरम्यान, नितीश यांच्या या निर्णयानंतर ‘जदयू’मध्ये उभी फूट पडण्याची शक्यता आहे. नितीश यांच्या निर्णयावर पक्षातील वरिष्ठ नेते शरद यादव सुरूवातीपासून नाराज आहेत. मात्र, त्यांची समजूत काढण्याऐवजी, शरद यादव त्यांचा निर्णय घ्यायला मोकळे आहेत, अशी प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिली होती. भाजपसोबत हातमिळवणी करण्याचा निर्णय सगळ्यांना विश्वासात घेऊनच मी घेतला होता, शरद यादव यांना माझा निर्णय पटला नसेल तर त्यांनी खुशाल स्वतःचा मार्ग निवडावा त्यांना कोणीही थांबवणार नाही असंही नितीशकुमार यांनी सांगितले. तर दुसरीकडे पक्षाचे खासदार अली अन्वर यांनी काल दिल्लीत झालेल्या विरोधकांच्या बैठकीला हजेरी लावल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

भाजपचा प्रत्येक शत्रू आमचा मित्र- ममता बॅनर्जी