गायीसोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या एका तरुणाला लोकांनी चोप दिला आहे. उत्तराखंडच्या सतपुलीमध्ये हा प्रकार घडला असून यामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे. या घटनेनंतर जमावाने तरुणाला मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर संतप्त लोक पोलीस ठाण्याबाहेर गोळा झाले आणि त्यांनी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली. या घटनेनंतर पोलिसांनी जमावाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

सतपुल भागातील एका १८ वर्षांच्या तरुणाला काही जणांनी घरमालकाच्या गायीसोबत अनैसर्गिक कृत्य करताना पकडले. पेशाने सुतार असलेल्या या तरुणाला पकडल्यानंतर जमावाने त्याला मारहाण केली. यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी आरोपीला पोलीस ठाण्यात आणले. यानंतर या घटनेची माहिती भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना समजली. यानंतर संतापलेले भाजप कार्यकर्ते पोलीस ठाण्याबाहेर जमले आणि त्यांनी आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी केली. न्यूज १८ ने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातल्याने पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारीही पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी संतप्त जमावाची समजूत काढण्याचे प्रयत्न केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. अखेर पोलिसांच्या प्रयत्नांनतर हा तणाव निवळला.

मागील महिन्यात असाच एक प्रकार महाराष्ट्रात घडला होता. अहमदनगरमधील कोपरगावात एकाला गायीसोबत अनैसर्गिक कृत्य करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. गायीच्या मालकाने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली होती. ग्रामस्थांसोबत आरोपीला रंगेहात पकडल्याचे गायीच्या मालकाने पोलिसांना सांगितले होते. यानंतर संबंधित आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाकडून आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.