भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पूर्ती उद्योग समूहातील मुंबईत नोंदणी झालेल्या कंपन्यांची चौकशी प्राप्तिकर खात्यामार्फत करण्यात येत आहे. पूर्ती कंपनीशी संबंधीत मुंबईतील नऊ ठिकाणांवर प्राप्तीकर खात्यामार्फत आज (मंगळवार) छापे टाकण्यात आले. काही महिन्यांपूर्वीच गडकरी यांच्या कंपनीशी संबंधित अशा मुंबई, पुणे, नागपूर व कोलकाता येथील १२ ठिकाणांवर छापे मारण्यात आले होते. बुधवारी गडकरी दुस-यांदा भाजपच्या अक्षपदी विराजमान होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हे छापे टाकण्यात आल्याने गडकरी आणि भाजपही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
पूर्ती कंपनीतील कथित गैरव्यवहारामुळे गडकरींनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी पक्षातीलच विरोधकांनी केली होती. तसेच भाजप नेते महेश जेठमलानी यांनी त्यांच्याविरोधात निवडणूक लढण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे गडकरींसमोरील अडचणींमध्ये भर पडतानाच दिसत आहे.