राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव आणि कुटुंबीयांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने आता लालूप्रसाद यांच्या कन्या खासदार मिसा भारती आणि जावई यांना समन्स बजावले आहे. दिल्लीत लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबातील सदस्यांनी बोगस कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधींच्या जमिनी कवडीमोल दराने खरेदी केल्याचे समोर आले होते. याच प्रकरणात या दोघांनाही आयकर विभागाने समन्स बजावले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

[jwplayer 9xaU4cUi-1o30kmL6]

लालूप्रसाद यांच्या कुटुंबातील सदस्यांवर कोट्यवधींची जमीन कवडीमोल दराने खरेदी केल्याचे आरोप झाल्यानंतर राज्यसभा खासदार मिसा भारती आणि जावई शैलेश कुमार संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राजधानी दिल्लीत त्यांच्याद्वारे १ कोटी ४१ कोटी रुपयांना खरेदी केलेल्या मालमत्तेची किंमत १०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी मंगळवारी मिसा भारती यांचे सीए राजेश अग्रवाल यांना अंमलबजावणी संचलनालयाने मनी लाँडरिंग प्रकरणात अटक केली होती. त्याची चौकशी केल्यानंतर आयकर विभागाने मिसा आणि शैलेश यांना नोटीस बजावली आहे.

काही दिवसांपूर्वीच लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित दिल्ली, गुरुग्रामसह २२ ठिकाणांवर आयकर विभागाने छापेमारी केली होती. १००० कोटींच्या बेनामी संपत्ती प्रकरणात ही कारवाई करण्यात आली होती. त्याचबरोबर राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि लालूप्रसाद यांचे निकटवर्तीय प्रेमचंद गुप्ता यांच्याशी संबंधित ठिकाणांवरही छापेमारी करण्यात आली होती. विशेष म्हणजे, भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी लालूप्र साद आणि त्यांच्या कुटुंबीयांवर घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.