मुंबईतील एका कुटुंबाने तब्बल २ लाख कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केल्याने खळबळ माजली आहे. एकाच कुटुंबाकडे ऐवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्ती कशी आली याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. तर आयकर विभागाने याप्रकरणावर संशय व्यक्त केला आहे. या कुटुंबाचा दावा खोटा असू शकतो आणि याची सखोल चौकशी केली जाईल असे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे.

मुंबईतील वांद्रा येथे राहणा-या सय्यद कुटुंबाने केंद्र सरकारच्या ‘उत्पन्न प्रकटन योजना २०१६’ या योजनेंतर्गत अघोषित संपत्ती जाहीर केली. यानुसार त्यांनी स्वतःकडील तब्बल २ लाख कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. सय्यद कुटुंब हे वांद्रे येथे राहतात. अब्दुल रझाक मोहम्मद सय्यद, त्यांचा मुलगा मोहम्मद आरिफ,  पत्नी रुक्साना आणि बहीण नूरजहाँ अशी या चौघांची नावे आहेत. सय्यद कुटुंब हे मुळचे राजस्थानमधील अजमेरचे रहिवासी आहेत. सप्टेंबर २०१६ मध्येच ते मुंबईत स्थलांतरित झाले होते.

सय्यद कुटुंबाने जाहीर केलेली संपत्ती आणि अहमदाबादमधील रहिवासी महेश शहा यांनी जाहीर केलेली १३ हजार कोटी रुपयांची अघोषित संपत्तीवर आयकर विभागाने संशय व्यक्त केला आहे. या दोघांचे दावे खोटेही असू शकतात अशी शक्यता आयकर विभागाने वर्तवली आहे. दुस-यांचा काळा पैसा लपवण्यासाठी शहा आणि सय्यद कुटुंबीयांचा वापर झाला असावा असा संशय व्यक्त होत आहे. सय्यद कुटुंबाचे उत्पन्न जास्त नाही, मग त्यांच्याकडे दोन लाख कोटी रुपये कसे येतील, अघोषित संपत्ती जाहीर करण्याच्या योजनेचा गैरवापर करण्यात आला आला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. आयकर विभागाच्या अधिका-यांनीही या शहा आणि सय्यद यांची सखोल चौकशी केली जाईल असे स्पष्ट केले. विशेष म्हणजे सय्यद कुटुंबाने जाहीर केलेले संपत्ती ही देशाच्या रेल्वे अर्थसंकल्पाऐवढी आहे. त्यामुळे त्यांच्या दाव्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

केंद्र सरकारने १ ऑक्टोबररोजी उत्पन्न प्रकटन योजनेअंतर्गत घोषित झालेल्या संपत्तीची आकडेवारी जाहीर केली होती. यानुसार ६४ हजार २७५ लोकांनी ६५ हजार २५० कोटी रुपयांची अघोषित संपत्ती जाहीर केल्याचे समोर आले होते. आता यामध्येही सुधारणा झाली आहे. आता तब्बल ६७ हजार ३८२ कोटी रुपयांची अघोषित संपत्ती जाहीर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र यामध्ये शहा आणि सय्यद यांनी जाहीर केलेल्या संपत्तीचा समावेश करण्यात आलेला नाही.