दिवाळी म्हटलं की खरेदी आली आणि खरेदी म्हटलं की खर्च आला. दिवाळीच्या दिवसांमध्ये लोकांकडून केल्या जाणाऱ्या याच खरेदीवर आता आयकर विभागाची नजर असणार आहे. आजकाल अनेक लोक खरेदीचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करतात. लोकांच्या याच खरेदीवर आयकर विभागाची करडी नजर असणार आहे. त्यामुळे महागडी कार, किमती घड्याळांसह इतर वस्तूंची खरेदी करुन त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करणाऱ्यांची आयकर विभागाकडून चौकशी होऊ शकते.

काळा पैसा आणि त्या माध्यमातून होणारे व्यवहार यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सरकार या महिन्यात ‘प्रोजेक्ट इनसाइट’ लॉन्च करणार आहे. या माध्यमातून महागड्या वस्तूंची खरेदी करणाऱ्या लोकांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बारिक लक्ष ठेवले जाईल. किमती वस्तूंची खरेदी करुन, त्याबद्दलची माहिती सरकारपासून लपवणाऱ्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी ‘प्रोजेक्ट इनसाइट’ सुरु केले जाणार आहे. या प्रोजेक्टच्या अंतर्गत एक व्हर्चुअल हाऊसची उभारणी केली जाईल. या माध्यमातून लोकांच्या बँक खात्यातील रक्कम आणि फेसबुक, इन्स्टाग्रामवरील त्यांच्या खरेदीचे फोटो यांची पडताळणी केली जाईल. यामध्ये विसंगती आढळून आल्यास आयकर विभागाकडून संबंधित व्यक्तीची चौकशी केली जाईल.

दिवाळीच्या दिवसांमध्ये महागड्या वस्तूंची खरेदी करुन त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करणाऱ्या सर्वांवर आयकर विभाग डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणार आहे. विशेष म्हणजे आयकर भरणाऱ्यासाठी पात्र असलेल्या आणि नसलेल्या, अशा दोन्ही वर्गांमधील लोकांवर केंद्र सरकार लक्ष ठेवणार आहे. यामध्ये काही चुकीचे आढळल्यास आयकर विभागाकडून चौकशीसाठी बोलावले जाईल. यामध्ये संबंधित वस्तूच्या खरेदीसाठी पैसे कुठून आणले, याची चौकशी केली जाईल.

गेल्या वर्षी आयकर विभागाने ‘प्रोजेक्ट इनसाइट’साठी ‘एल अॅण्ड टी’बरोबर एक करार केला होता. करचोरी करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी हे पाऊल सरकारकडून उचलण्यात आले. गेल्याच महिन्यात पंतप्रधान मोदींनी आयकर विभागाला तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचा सल्ला दिला होता. जगातील सर्वात मोठा बायोमॅट्रिक डेटाबेस तयार करण्याच्या उद्देशाने ‘प्रोजेक्ट इनसाइट’ची सुरुवात करण्यात आली आहे.