देश एकता, शांती आणि सद्भावनेवर चालतो, जातीयवादाचे विष कधीही देशाचे भले करु शकणार नाही. आस्थेच्या नावाखाली होणारा हिंसाचार खपवून घेणार नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कट्टरतावाद्यांना सुनावले आहे. स्वातंत्र्य चळवळीत ‘भारत छोडो’चा नारा होता, आता ‘भारत जोडो’चा नारा आहे असेही मोदी म्हणालेत. भारत ही महात्मा गांधी आणि बुद्धांची भूमी आहे, सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाणे ही देशाची परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले.

मंगळवारी देशभरात स्वातंत्र्य दिन (Independence Day 2017) उत्साहात साजरा होत असून सकाळी राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. ध्वजारोहणानंतर नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित केले. मोदींच्या भाषणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. मोदींनी त्यांच्या भाषणात सरकारने गेल्या चार वर्षात सुरु केलेल्या योजनांचा पाढा वाचून दाखवला. नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करताना मोदी म्हणाले, नोटाबंदीनंतर १ लाख ७५ हजार बोगस कंपन्यांची नोंदणी रद्द केली. याशिवाय करदात्यांची संख्यादेखील वाढली. काळा पैसा उघड झाल्याने सुमारे ३ लाख कोटी रुपये बँकेत जमा झाले. बँकेत पैसे जमा झाल्याने व्याज दरात कपात झाली असून यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असे त्यांनी सांगितले. ट्रेन रेल्वे ट्रॅक बदलते त्यावेळी तिचा वेग कमी होतो. आम्हीदेखील देशाला नवीन ट्रॅकवर नेण्याचा प्रयत्न करत आहोत, पण आम्ही त्याचा वेग कमी होऊ दिला नाही असा दावा त्यांनी केला

‘चलता है’ची मानसिकता बदलावी लागणार,’हो आपण बदल घडवू शकतो’ असा सकारात्मक विचार करण्याची गरज आहे असे मत त्यांनी मांडले. भारत स्वतःचे रक्षण करण्यासाठी सक्षम असून दहशतवादाविरोधातील लढाईत भारताला आता अन्य देशांचा पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ध्वजारोहणाला रवाना होण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केले.

मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे:

> महिला, तरुण आणि शेतकरी वर्गासाठी नवीन भारत घडवूया: मोदी

> नोटाबंदीनंतर करदात्यांची संख्या वाढली, आता देशात लूट होणार नाही, प्रत्येकाला उत्तर द्यावे लागेल: मोदी

> गॅस अनुदान असो किंवा स्वच्छ भारत किंवा नोटाबंदी, आमच्या प्रत्येक निर्णयाला जनतेने साथ दिली: मोदी

> मंगळावर आपण नऊ महिन्यात पोहोचलो, पण एक रेल्वे प्रकल्प ४२ वर्ष रखडला होता हे दुर्दैवच: मोदी

> लोकमान्य टिळकांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असे म्हटले होते, आता आपण सुराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असे म्हटले पाहिजे: मोदी

> ना गाली से, ना गोली से, समस्या सुलझेगी काश्मिरी को गले लगाने से: मोदी

> आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ‘वन रँक वन पेन्शन’चा प्रश्न निकाली काढला: मोदी

> देशभरात सध्या प्रामाणिकतेचे पर्व साजरे होत आहे, बेईमान लोकांना आता तोंड लपवण्यासाठी जागा उरलेली नाही: मोदी

> सर्वांनी एकत्र येऊन ‘न्यू इंडिया’ निर्माण केला पाहिजे: मोदी

> लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला यंदा १२५ वर्ष पूर्ण झाली: मोदी

> गोरखपूरमध्ये रुग्णालयात लहान मुलांचा मृत्यू झाला, या दुःखाच्या प्रसंगात संपूर्ण देश पालकांच्या पाठीशी आहे: मोदी

> लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण

> पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लाल किल्ल्यावर आगमन

> पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केले.