भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान होत असलेल्या डेडिकेटेड एअर कॉरिडॉरवरून चिनी माध्यमांचा चांगलाच जळफळाट झाल्याचे दिसत आहे. भारत- अफगाणिस्तानच्या वाढत्या जवळीकतेवर चिनी माध्यमांनी टीका केली आहे. चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’ने हा कॉरिडॉर भारताचा हेकेखोरपणा असल्याचे म्हटले आहे. भारत आणि अफगाणिस्तानचा हा प्रकल्प चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरला (सीपीइसी) उत्तर असल्याचे मानले जात आहे. गत आठवड़यात या कॉरिडॉरचे उद्घाटन झाले होते. दोन्ही देशातील द्विपक्षीय व्यवसायाला प्रोत्साहन देणे आणि मध्य आशियाई देशांना भारतीय बाजारपेठ मिळावी हा कॉरिडॉर सुरू करण्यामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात येते.

गेल्या काही काळांपासून भारत अफगाणिस्तानबरोबर आपले संबंध दृढ करत असून विकासासाठी अनेक पर्यायांचा विचार केला जात आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तान आणि इराणबरोबर चाबहार बंदर विकसित करत आहे. समुद्र मार्गाने व्यापार वाढावा आणि दूरवरच्या देशांपर्यंत पोहोचण्यासाठी या बंदराचा विकास केला जात आहे.

‘ग्लोबल टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात म्हटले आहे, भारत, अफगाणिस्तान आणि इराण यांच्यादरम्यान प्रस्तावित मार्गावर मोठे प्रश्नचिन्ह आहे. भारत पाकिस्तानकडे दुर्लक्ष करून अफगाणिस्तान आणि इतर मध्य आशियाई देशांबरोबर व्यापारी संबंध विकसित करू शकेल ? कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी या सर्व प्रयत्नांतून भारताने क्षेत्रिय आर्थिक विकासातील भागिदारी वाढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु, यावरून भारताची हेकेखोर क्षेत्रीय आणि राजकीय इच्छाशक्ती दिसून येते, असेही या लेखात म्हटले आहे.

या लेखात चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरवरून भारताच्या विरोधाचाही उल्लेख करण्यात आला आहे. पाक व्याप्त काश्मीरमधून जाणाऱ्या या मार्गाबाबत भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंता व्यक्त केली आहे. भारत नेहमीच अशा प्रकल्पांना विरोध करत आल्याचे या लेखात म्हटले आहे. आपली कनेक्टिव्हिटी नेटवर्क विकसित करण्यासाठी भारताचे सीपीइसीला चोख प्रत्युत्तर असल्याचे मानले जाते.

तणाव असतानाही भारताला पाकिस्तानबरोबर आर्थिक आणि व्यापारी संबंध चांगले बनवायचे आहेत, असे या लेखात म्हटले आहे. भारत काय विचार करतो याला काहीच महत्व नाही. जर या देशाला खरंच क्षेत्रीय आर्थिक विकासाचा भागीदार बनायचं असेल तर त्यांना पाकिस्तानकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.