भारतीय लष्कराने राजौरीतील नौशेरा सेक्टरमधील पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या उद्ध्वस्त केल्याचे जाहीर केल्यापासून पाकिस्तान चवताळल्याचे दिसत आहे. भारताच्या या कारवाईमुळे चिडलेल्या पाकने बुधवारी सियाचीनमधून लढाऊ विमानाचे उड्डाण केल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला. परंतु, भारतीय हवाईदलाने पाकचा हा दावा फेटाळला आहे. भारतीय हद्दीतून अशा कोणत्याही लढाऊ विमानाचे उड्डाण झाले नसल्याचे हवाईदलाने म्हटले आहे. दरम्यान, भारतीय लष्कराच्या कारवाईनंतर पाकिस्तानी लष्कराने आपल्या सर्व लष्करी हवाई तळांना सज्जतेचे आदेश दिले असल्याचा दावाही पाक माध्यमांनी केला होता. सियाचीनमधून पाकचे लढाऊ विमान उडताना त्यांचे वायुदलप्रमुखही सियाचीनला आले होते व त्यांनीही तेथून लढाऊ विमानाचे उड्डाण केल्याचे काही वृत्त वाहिन्यांनी म्हटले आहे. सीमारेषेजवळ पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे आणि काही दिवसांपूर्वी भारतीय सैनिकांच्या मृतदेहाची विटंबना केल्यामुळे दोन्ही देशातील संबंध आणखी ताणले गेले आहेत.

भारतीय लष्कराने मंगळवारी एक व्हिडिओ जारी करून सैन्याने नौशेरा आणि नौगाम सेक्टरमधील पाकिस्तानच्या चौक्या उद्धवस्त केल्याचे सांगितले होते. हे ऑपरेशन पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेले शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि घुसखोरीविरोधात दिलेले प्रत्युत्तर होते, असे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले होते. भारतीय लष्कराने या ऑपरेशनमध्ये रॉकेट लाँचर, अँटी टँक मिसाइल आणि ऑटोमॅटिक शस्त्रास्त्रांचा वापर केला होता.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लष्कराने जारी केलेला हा व्हिडिओ ९ मे रोजी आहे. यामध्ये नौशेरा सेक्टर येथील बंकर उद्धवस्त करण्यात आले होते. पाकिस्तानी सैन्य घुसखोरांना काश्मीरमध्ये घुसण्यास मदत करत असल्याचा आरोप भारतीय लष्कराच्या प्रवक्त्याने केला.

दरम्यान,  भारतीय लष्करानं राजौरीतील नौशेरा सेक्टरमधील पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या उद्ध्वस्त केल्याची माहिती खोटी असल्याचा दावा पाकिस्तानने केला. भारतावर शस्त्रसंधी उल्लंघनाचा आरोप केल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतीय सैन्यांना प्रत्युत्तर देताना आम्ही नौशेरातील भारतीय चौक्या उद्ध्वस्त केल्याचा दावा त्यांनी केला आहे.