भारत आणि अमेरिका केवळ नैसर्गिक मित्र नसून, चांगले मित्र असल्याचा पुनरुच्चार करीत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी या दोन्ही देशांनी एकत्रितपणे जगासाठी दिशादर्शक काम केले पाहिजे, अशी अपेक्षा मंगळवारी व्यक्त केली. धार्मिक स्वातंत्र्य राखल्यास भारताचे यश कोणीही थोपवू शकणार नाही, असा सल्लाही ओबामा यांनी दिला.
गेल्या दोन दिवसांपासून भारत भेटीवर असलेल्या ओबामा यांनी मंगळवारी सकाळी दक्षिण दिल्लीतील सिरी फोर्ट सभागृहात विविध क्षेत्रांतील निवडक मान्यवर आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सुमारे ३० मिनिटे अत्यंत उत्स्फूर्तपणे केलेल्या भाषणात ओबामा यांनी दोन्ही देशांतील संबंध, मानवाधिकार, स्वातंत्र्य, महिलांची प्रगती यासह विविध विषयांवर आपले विचार मांडले. यावेळी त्यांची पत्नी मिशेल या सुद्धा सभागृहात उपस्थित होत्या.
भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचा इतिहास आणि भाषा वेगवेगळे असले, तरी चंद्रावर आणि मंगळावर जाणाऱया निवडक देशांपैकी ते एक आहेत, याचा उल्लेख करून ओबामा म्हणाले, समानता आणि स्वातंत्र्य हे दोन्ही देशांमधील महत्त्वाचे मूल्य आहे. एखाद्या देशाकडे किती शस्त्रे आहेत, यावर तो मोठा ठरत नाही. तर तिथे मानवाधिकार आणि व्यक्तिस्वातंत्र्य किती मिळते, यावर त्याचे मोठेपण ठरते. देशातील गरिबांची स्वप्नेही इतर व्यक्तींइतकीच महत्त्वाची आहेत. त्यांना स्वप्ने बघण्याचा आणि ती साकारण्यासाठी प्रयत्न करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. भारतामध्ये हे चित्र पाहायला मिळते. मी आणि मिशेल दोघेही अत्यंत गरीब कुटुंबातून आलो आहे. आम्ही शिष्यवृत्तींच्या साह्याने आणि शिक्षकांनी केलेल्या संस्कारांमुळे इथपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे ते स्वप्न बघू शकतात आणि ती साकारण्यासाठी प्रयत्नही करू शकतात.
कोणत्याही देशतील महिला यशस्वी झाल्या तरच तो देश यशस्वी होतो, यावरही ओबामा यांनी आपल्या भाषणात जोर दिला. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने जगण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, असेही ते म्हणाले.
जग अण्वस्त्रमुक्त असले पाहिजे, असे सांगत ओबामा यांनी भारत आणि अमेरिकेतील अणुकरारामुळे प्रदूषणमुक्त विजेची उपलब्धता वाढणार असल्याकडे लक्ष वेधले. भारतातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पासाठीही मदत करण्यास अमेरिका तयार असल्याचे त्यांनी सांगितले. भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरुपी सदस्यत्व मिळावे, यासाठीही आपण प्रयत्न करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारताला आमचे सहकार्य राहील, असे सांगून दक्षिण आशिया उपखंडामध्ये भारताने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपल्या भाषणात त्यांनी मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांची अनेक उदाहरणे दिली.