भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या आरोग्य प्रमाणपत्राची मागणी भारताकडून करण्यात आली आहे. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या आरोग्याबद्दलची माहिती देणारे प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. भारतीय नौदलाचे माजी अधिकारी असलेल्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाचे फाशीची शिक्षा सुनावली आहे.

‘कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या ताब्यात असल्याने त्यांची प्रकृती हा भारताच्या दृष्टीने चिंतेचा मुद्दा आहे,’ परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बगलय यांनी म्हटले. कुलभूषण जाधव गेल्या वर्षभरापासून पाकिस्तानच्या कैदेत आहेत. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरीचा ठपका ठेवला आहे. ‘आम्ही त्यांना (जाधव) यांना पाहिलेले नाही. आम्ही त्यांची भेटही घेऊ शकलेलो नाही. ते वर्षभराहून अधिक कालावधीपासून पाकिस्तानच्या ताब्यात असल्याने त्यांच्या आरोग्याविषयी आम्हाला चिंता वाटते,’ असे गोपाळ बगलय यांनी म्हटले.

‘कुलभूषण जाधव यांच्या प्रकृतीविषयी आम्ही पाकिस्तान सरकारकडे याआधीही विचारणा केली आहे. काल (बुधवारी) पाकिस्तानमधील भारताचे उच्चायुक्त गौतम बंबवाले यांनीदेखील कुलभूषण जाधव यांचे आरोग्य प्रमाणपत्र दिले जावे, अशी विनंती पाकिस्तानकडे केली. आता आम्ही पाकिस्तानच्या उत्तराची वाट पाहात आहोत,’ असे बगलाय यांनी म्हटले.

कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेली फाशी रद्द करण्यासाठी त्यांच्या आईने काल (बुधवारी) पाकिस्तानी न्यायालयात धाव घेतली होती. कुलभूषण जाधव यांची फाशी रद्द करण्यासाठी भारतीय दूतवासाकडून कुलभूषण यांच्या आई अवंती जाधव यांच्या नावाने पाकिस्तानच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.

कुलभूषण जाधव यांच्यासोबत संपर्क साधता यावा, यासाठी भारताकडून काल १६ व्यांदा कॉन्स्युलर अॅक्सेससाठी अपील करण्यात आले. भारताकडून कॉन्स्युलर अॅक्सेससाठी करण्यात आलेली १५ अपील आतापर्यंत पाकिस्तानकडून रद्द करण्यात आली आहेत. पाकिस्तानचे राजदूत अब्दुत बासित यांनी ‘भारत आणि पाकिस्तानमधील २००८ च्या कराराद्वारे फक्त सामान्य कैदी आणि मच्छिमारांसाठीच कॉन्स्युलर अॅक्सेस दिला जातो. कुलभूषण जाधव हे भारताचे हेर असल्याने त्यांना कॉन्स्युलर अॅक्सेस दिसा जाऊ शकत नाही. त्यामुळेच पाकिस्तानने कुलभूषण जाधव प्रकरणात कॉन्स्युलर अॅक्सेसची मागणी फेटाळली आहे’ असे सोमवारी म्हटले होते.