भारताच्या सैन्याने सिक्कीम भागात सीमा ओलांडून आमच्या हद्दीत प्रवेश केला असा उलटा कांगावा आता चीनने केला असून, भारतीय सैन्याच्या माघारीची मागणी केली आहे. सीमेवरील पेचप्रसंगामुळे भारतीय यात्रेकरूंना मानसरोवर यात्रेसाठी नथुला खिंडीतून प्रवेश देण्यास बंदी केली आहे असे चीनने म्हटले आहे.

नवी दिल्ली व बीजिंग येथे भारताकडे राजनैतिक निषेध नोंदवण्यात आला असून, त्यात भारतीय सैन्याने सिक्कीम क्षेत्रात हद्द ओलांडून चीनमध्ये प्रवेश केल्याचा आरोप केला आहे, असा आरोप चीनने केला आहे. चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते लु कांग यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, की आम्ही बीजिंग व नवी दिल्ली येथे भारताला निषेध खलिते दिले आहेत. देशाचे सार्वभौमत्व टिकवणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, त्यामुळे भारत त्याच पद्धतीने चीनबरोबर वाटाघाटी करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करील अशी आशा आहे. भारतीय सैन्याने चीनची सीमा ओलांडली असून त्यांना माघारी घेण्यात यावे असे चीनने सांगितले.

यात्रेकरूंना प्रवेश नाकारल्याचे कारण उघड

सीमा प्रश्नातील सुरक्षा मुद्दय़ामुळे आम्ही भारतीय यात्रेकरूंना नथुला खिंडीमार्गे मानसरोवर यात्रेसाठी प्रवेश दिला नाही असे चीनने काल रात्री स्पष्ट केले. भारताने सीमा सुरक्षारक्षक माघारी घ्यावेत व त्याची चौकशी करावी असे परराष्ट्र मंत्रालयाचे दुसरे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी म्हटले आहे. डोंगलांग येथे अलीकडेच भारतीय सैन्यातील सुरक्षारक्षकांनी घुसखोरी केल्याचा कांगावा चीनने केला असून, त्यामुळे चीनच्या सीमा दलांच्या कामात अडथळे आल्याचा आरोप केला आहे. चीनने त्यांच्या असलेल्या कथित प्रदेशात रस्ता बांधण्याचे काम सुरू केले तेव्हा भारतीय सैन्याने त्याला आक्षेप घेतला होता, त्यावर आता चीनच्या संरक्षण मंत्रालयानेही निवेदन केले आहे. हा रस्ता बांधण्याच्या वादातूनच ४७ भारतीय यात्रेकरूंना नथुला खिंडीतून कैलास मानसरोवर यात्रेस जाण्यास प्रवेश नाकारण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

डोंगलांग भागावर चीनचा दावा

डोंगलांग भाग आमचाच असून तेथे आम्ही रस्ता बांधणारच अशी भूमिका चीनने घेतली आहे. त्या वेळी चीनच्या रस्ताबांधणीला भारतीय सैन्याने प्रत्यक्ष ताबारेषा ओलांडून रोखण्याचा प्रयत्न केला, असे गेंग यांचे म्हणणे आहे. काल चीनच्या सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याच्या बातम्या आल्या असून दोन बंकर्स नष्ट केल्याची माहिती आहे. दोन देशांच्या सैन्यात चकमकी झाल्याची ही घटना सिक्कीममधील लालटेन पोस्ट येथे जूनच्या पहिल्या आठवडय़ात झाली होती. भारत-चीन यांच्यातील १९६२च्या युद्धानंतर हा भाग भारतीय सैन्य व इंडो तिबेट सीमा पोलिस दलाच्या ताब्यात आहे. आंतरराष्ट्रीय सीमेपासून १५ किमी अंतरावर हा भाग आहे.