उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी सोमवारी चीनचे अध्यक्ष झी जीनपिंग यांची भेट घेऊन भारतातील नव्या सरकारची परस्परसंबंध वृद्धिंगत करण्याची इच्छा असल्याचे जीनपिंग यांना सांगितले. या वेळी अन्सारी यांनी सीमाप्रश्नाबाबत भारताला चिंता असल्याचेही स्पष्ट  केले. औद्योगिक पार्क आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या पुराबाबतची माहिती देण्याबाबत दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले.
येत्या काही दिवसांत ब्राझीलमध्ये ‘ब्रिक्स’ परिषद होणार असून त्या वेळी जीनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रथमच भेट होणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर अन्सारी आणि जीनपिंग भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
झी जीनपिंग हे या वर्षांच्या उत्तरार्धात भारत भेटीवर येणार असून त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. भारताशी संबंध ठेवण्यास त्यांना कितपत स्वारस्य आहे ते या दौऱ्यातून अधोरेखित होणार आहे. ‘पंचशील’च्या ६०व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अन्सारी येथे आले आहेत.
पंतप्रधान ली केकियांग यांच्याशीही अन्सारी यांनी दोन दिवसांपूर्वी चर्चा केली. अरुणाचल प्रदेशचा समावेश चीन आपल्या देशाच्या नकाशात करीत असल्याचा मुद्दा अन्सारी यांनी उपस्थित केला. इतकेच नव्हे तर पाकव्याप्त काश्मीरमधून पाकिस्तानशी रेल्वेने जोडण्याची चीनची योजना असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. चीनच्या सैन्याकडून सीमेवर घुसखोरीचे वाढते प्रकार होत असल्याचेही या वेळी अन्सारी यांनी निदर्शनास आणून दिले.