भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक्स केल्याची माहिती गुरूवारी लष्करी कारवाई विभागाचे महासंचालक (डीजीएमओ) रणबीर सिंग यांच्याकडून देण्यात आली. देशाच्या सुरक्षेसाठी ही कारवाई करण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालय आणि लष्कराच्या संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. काही दहशतवादी भारतात घुसखोरी करण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर एकत्र आल्याची विश्वसनीय माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानंतर भारतीय लष्कराने या दहशतवादी तळावर हल्ला चढवला. या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेले असून, त्यांचे गंभीर नुकसान झाल्याची माहिती भारतीय लष्कराचे रणबीर सिंग यांनी दिली.
सीमेवर हालचाली तीव्र, पंजाबमधील काही गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले
भारताच्या सुरक्षेच्यादृष्टीनेच सर्जिकल स्ट्राईक्स करण्याचा निर्णय घेण्यात आला. भविष्यात अशाप्रकारची कारवाई करण्याचा आमचा कोणताही इरादा नाही. याबद्दल पाकिस्तानला माहिती देण्यात आलेली आहे, असेही यावेळी लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले. नियंत्रण रेषेपल्याड करण्यात आलेल्या या धडक मोहिमेत एकही भारतीय जवान जखमी झालेला नाही. भारतीय लष्कराने ही कारवाई करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, उपराष्ट्रपती हमिद अंसारी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना #SurgicalStrikes ची माहिती दिली होती.
राष्ट्रपती, माजी पंतप्रधानांसह प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय


दरम्यान, या पत्रकारपरिषदेत रणबीर सिंग यांनी पाककडून वारंवार करण्यात येणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा मुद्दाही उपस्थित केला. पाकने नियंत्रण रेषेजवळ आतापर्यंत शस्त्रसंधीचे २० वेळा उल्लंघन केले आहे. मात्र, प्रत्येकवेळी भारताने पाकचे हल्ले परतवून लावले होते. भारतविरोधी कारवाईसाठी दहशतवाद्यांना पाकिस्तानने आपली जमीन वापरण्यास देऊ नये हे आम्ही पूर्वीपासून त्यांना सांगत आलो आहोत. आम्ही ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्यांनी चौकशीदरम्यान पाकिस्तानात घेतलेल्या प्रशिक्षणाची व शस्त्रांची माहिती दिली आहे. याबाबतही आम्ही अनेकवेळा पाकिस्तानला कळवले असल्याचे यावेळी रणबीर सिंग यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत सीमेवर घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. परंतु आपल्या सैन्य दलाच्या सतर्कतेमुळे भारताचे नुकसान कमी झाले आहे. याचे सर्व श्रेय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना जाते, असे रणबीर सिंह यांनी म्हटले.
सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय? तो कसा केला जातो?
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकव्याप्त काश्मीरमध्ये सहा ते आठ दहशतवादी तळांवर भारतीय कमांडोंकडून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले. रात्री १२. ३० ते पहाटे ४.३० वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. नियंत्रण रेषे पलीकडे सुमारे एक ते तीन किलोमीटरच्या क्षेत्रात ही कारवाई करण्यात आली आहे.
मोदींनी दिली पाकिस्तानला शिक्षा, ट्विटरवर चर्चा