मुंबई हल्ल्यातील सूत्रधार झाकी उर रहमान याला तुरूंगातून सोडल्याच्या विरोधात पाकिस्तान विरोधी प्रस्तावावर चीनने विरोध केला, त्यामुळे सुरक्षा मंडळाचे स्थायी सदस्य देश दहशतवाद्यांना रोखण्यात पक्षपाती दृष्टिकोन अवलंबत आहेत, असा आरोप भारताने केला आहे. सुरक्षा मंडळाच्या दहशतवाद रोखण्याच्या क्षमतेबाबतही भारताने प्रश्न उपस्थित केला आहे.
संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत अशोक मुखर्जी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सॅनफ्रान्सिस्को जाहीरनाम्याच्या सत्तराव्या वार्षिक दिनानिमित्त सांगितले, की संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांवर दहशतवाद्यांनी हल्ले केले आहेत पण त्यांच्यावरही खटले भरण्यात आले नाहीत. सुरक्षा मंडळाचे काही स्थायी सदस्य दहशतवादाबाबत पक्षपाती भूमिका घेत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्याच नियमांना विरोध केला जात आहे. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेला आज असलेल्या धोक्याचे आव्हान पेलण्यासाठी सुरक्षा मंडळाची इच्छाशक्ती कितपत आहे याची आता शंका येत आहे. र्निबधांमुळे संयुक्त राष्ट्रांची दहशतवादाविरोधात मदत होते पण गेल्या काही वर्षांत र्निबधांचा वापर पारदर्शक पद्धतीने दहशतवादाविरूद्ध केला गेला नाही.
पाकिस्तानच्या लष्कर-ए- तोयबाचा अतिरेकी व मुंबई हल्ल्यातील एक सूत्रधार लख्वी याला पाकिस्तानने तुरूंगातून सोडून दिल्याच्या विरोधात भारताने मांडलेला ठराव चीनने रोखला. त्याअनुषंगाने मुखर्जी यांनी सुरक्षा मंडळावरच आरोप केला. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाची निवडणूक गेल्या ७० वर्षांत लोकशाही पद्धतीने का घेण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी पाच स्थायी सदस्यांना केला आहे.