विज्ञान आणि तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती आणि परिवहन या क्षेत्रात परस्पर सहकार्य अधिकाधिक दृढ करण्यासाठी गुरुवारी भारत आणि फ्रान्समध्ये करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रॅन्क्वा ओलॉँद यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
रेल्वे स्थानकांची सुधारणा, अतिशय वेगाने गाडय़ा धावतील असे महामार्ग आणि रेल्वे प्रणालीचे आधुनिकीकरण या क्षेत्रात सहकार्य करण्याचे दोन्ही देशांमध्ये ठरविण्यात आले. अंतराळ सहकार्य कार्यक्रमांतर्गत भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) आणि फ्रान्सची सीएनईएस यांच्यात कार्यशाळा आयोजित करण्यासाठी संयुक्तपणे शास्त्रज्ञांच्या आणि व्यावसायिकांच्या अनुभवांची देवाणघेवाण करण्याबाबत सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले आहे. कलावंत, वास्तुस्थापत्यतज्ज्ञ, विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, क्रीडापटू यांच्या अनुभवांची देवाणघेवाण करून जनतेचा जनतेशी संपर्क साधण्यासाठी दोन्ही देशांमध्ये करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
जैतापूर प्रकल्पविरोधी निदर्शने
फ्रॅन्क्वा ओलॉँद यांच्या भारतभेटीच्या पाश्र्वभूमीवर जैतापूर प्रकल्प विरोधकांनी गुरुवारी येथे जोरदार निदर्शने केली. फुकुशिमासारखी दुर्घटना होऊ नये म्हणून हा अणुऊर्जा प्रकल्प उभारताना आवश्यक ते सुरक्षिततेचे उपाय योजले जात नसल्याबद्दल विविध संघटनेच्या विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी येथे या प्रकल्पाच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.
फ्रान्समधील अरेव्हा कंपनीच्या सहकार्याने महाराष्ट्रात जैतापूर येथे हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ज्या जागेवर हा प्रकल्प उभा राहतोय त्या ठिकाणी हापूस आंब्याची लागवड होत होती. त्यामुळे हा प्रकल्प उभा राहिल्यास तेथील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान तर होणार आहेच, त्यामुळे अशा ठिकाणी आम्हाला फुकुशिमासारखा दुसरा अनर्थ होऊ द्यायचा नाही, असे  ‘एआयपीडब्ल्यूए’च्या सरचिटणीस कविता कृष्णन यांनी सांगितले.