लडाखमधील चीनच्या घुसखोरीवरून उभय देशांत निर्माण झालेला पेच, त्यापायी झालेला बेबनाव आणि आता माघारीनंतरही तणावाचे उरलेले सावट या पाश्र्वभूमीवर संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी शनिवारी चीनला ठणकावले. आपल्या भूभागात सरहद्दीलगत पायाभूत सेवा उभारण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
आपल्या हद्दीत सीमाक्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रत्येक देशाला अधिकार आहे. चीनला तो आहे तसाच आम्हालाही आहे. सरहद्दीलगत आमचे लष्करी व हवाई दलासाठीचे पायाभूत क्षेत्र अद्ययावत करण्याची प्रक्रिया यापुढेही नेटाने पार पाडली जाईल, असे अँटनी यांनी पत्रकारांना सांगितले.
लडाखमधील दौलत बेग ओल्डी येथे चीनने केलेल्या घुसखोरीचा पेच २१ दिवस कायम होता. भारताने लडाखमधील चुमर भागातील आपल्या लष्करी छावण्या हटविण्याची चीनची अट मान्य केल्यानंतरच चीनने माघार घेतल्याच्या बातम्या होत्या. परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी मात्र माघारीसाठी उभय देशांत कोणताही समझोता झाल्याचा इन्कार केला होता. या पाश्र्वभूमीवर अँटनी यांच्या विधानांना महत्त्व आले आहे.
चुमर क्षेत्रातील आपले खंदक भारत नष्ट करीत आहे का, या प्रश्नावर अँटनी म्हणाले की, या मुद्दय़ावर उभय देशांतली चर्चा संपली आहे आणि उभय देशांच्या लष्करप्रमुखांना प्रत्यक्ष कार्यवाही पार पाडायची आहे.
उभय देशांतला कोणताही पेच हा मुत्सद्दी पातळीवर चर्चेच्या माध्यमातूनच सोडवला जावा, अशी आमची भूमिका आहे, असेही त्यांनी सांगितले.
चीनकडून झालेली घुसखोरी ही भारताची लष्करी नामुष्की आणि संरक्षणसिद्धतेतील गंभीर चूक नाही का, या प्रश्नाला त्यांनी थेट उत्तर दिले नाही. उभय देशांत जे काही घडले ते विसरून आता ‘जैसे थे’ स्थिती राखायचा निर्णय दोघांनी घेतला आहे, एवढेच ते म्हणाले.