भारताने यावर्षी जागतिक किरकोळ विकास सूचकांकात चीनला मागे टाकले आहे. किरकोळ बाजारपेठेतील गुंतवणुकीसाठी जागतिक ब्रँड्ससाठी भारत हे महत्वाचे केंद्र ठरले आहे. भारतीय उद्योग विश्वासाठी ही खूशखबर असल्याचे मानले जाते.

रिअल इस्टेट क्षेत्रातील सल्लागार कंपनी सीबीआरइने दक्षिण आशियाच्या ‘इंडिया रिटेल मार्केट रिपोर्ट’ या अहवालात ही माहिती दिली आहे. या अहवालानुसार यावर्षीच्या पहिल्या सहा महिन्यात सात नव्या जागतिक ब्रँड्सनी देशांतर्गत बाजारपेठेत प्रवेश केला आहे. किरकोळ बाजारपेठेतील गुंतवणूक २० कोटी डॉलरपर्यंत पोहोचली आहे. देशात पूर्वीपासून कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय ब्रँडनी आपल्या व्यवसायात विस्तार केल्याचे या अहवालात म्हटले आहे.

सीबीआरइचे अध्यक्ष (भारत आणि दक्षिण आशिया) अंशुमन मॅगजीन म्हणाले, विकसनशील देशांमध्ये भारत हा आंतराष्ट्रीय ब्रँडसाठी मोठी बाजारपेठ आहे. या अहवालानुसार आपले पहिले रिटेल स्टोअर सुरू करणाऱ्या ब्रँडमध्ये केट स्पेड, स्कॉच अँड सोडा, पँडोरा आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर एच अँड एम, जॅक अँड जोन्स, यूएस पोलो, टॅको बेलसह २१ इतर कंपन्यांनीही आपला व्यवसाय वाढवला आहे.

किरकोळ क्षेत्रासाठी भाड्याच्या हिशेबाने देशाची राजधानी कनॉट प्लेस, खान मार्केट तसेच साऊथ एक्स आणि कोलकाता येथील पार्क स्ट्रीट हे महाग आहेत. तर मुंबईतील लिंकिंग रोड आणि पुणे येथील एमजी रोड परिसरातील दुकानांच्या भाड्यात घसरण झाली आहे.