लेखिका तस्लिमा नसरीन यांचे मत
भारत हा असहिष्णू देश आहे असे आपल्याला वाटत नाही. धर्मनिरपेक्षतावादी केवळ हिंदू मूलतत्त्ववाद्यांनाच याप्रकरणी जबाबदार धरत आहेत याचे मला आश्चर्य वाटते, असे बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी सांगितले.
ढोंगी धर्मनिरपेक्षतावादावर आधारित लोकशाही ही खरी लोकशाही नसते. भारत हा सहिष्णू देश आहे व अनेक लोक एकमेकांच्या श्रद्धांबाबत सहिष्णू आहेत, असे मला वाटते असे त्यांनी केरळ साहित्य महोत्सवात सांगितले. असहिष्णुता या विषयावरील चर्चेत त्यांनी हे वक्तव्य केले.
तस्लिमा नसरीन या भारतात येण्यापूर्वी विजनवासात राहात होत्या व १९९४ मध्ये त्यांच्या ‘लज्जा’ या कादंबरीवरून मूलतत्त्ववाद्यांचा राग त्यांनी ओढवून घेतला होता. त्या म्हणाल्या की, भारतातील कायदे हे मूलतत्त्ववादाला पाठिंबा देणारे नाहीत, पण देशात अनेक असहिष्णू लोक आहेत, याचा अर्थ देश असहिष्णू आहे असा नाही.
देशातील धर्मनिरपेक्षतावादी नेहमी मुस्लीम मूलतत्त्ववाद्यांना सोडून हिंदूू मूलतत्त्ववाद्यांवरच आरोप का करतात असे विचारले असता त्यांनी सांगितले की, भारतात धर्मनिरपेक्षता व मूलतत्त्ववाद, नवता व परंपरा, स्वातंत्र्यमूल्याचे जतन करणारे व हे मूल्य झिडकारणारे असा संघर्ष
आहे.
मूलतत्त्ववाद्यांनी ज्या विकृती निर्माण केल्या, त्यामुळे सर्वच धर्म हे स्त्रियांच्या विरोधात आहेत. धर्म हा राजकारणापासून वेगळा ठेवला पाहिजे, धर्माचा पगडा राजकारणावर असल्याने बांगलादेशात हिंदू व मुस्लीम महिलांना दडपशाही सहन करावी लागली. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरचे किमान दीडशे लेखक-लेखिका या साहित्य महोत्सवास उपस्थित
होते.