भारत दहशतवादाची झळ बसलेला देश असल्याचे विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये बोलताना केले आहे. अरब इस्लामिक यूएस संमेलनात बोलताना भारत दहशतवादाचा पीडित असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. कोणत्याही देशाने आपल्या भूमीवर दहशतवाद्यांना थारा देऊ नये, असेदेखील डोनाल्ड ट्रम्प संमेलनाला संबोधित करताना म्हणाले.

‘भारत, रशिया, चीन आणि ऑस्ट्रेलिया हे सर्व देश दहशतवादाचे पीडित आहेत. यासोबतच अमेरिका आणि युरोपमधील देशांनादेखील दहशतवादाचा फटका बसला आहे,’ असे ट्रम्प अरब इस्लामिक यूएस संमेलनात बोलताना म्हणाले. या समीटमध्ये मुस्लिमबहुल राष्ट्रांचे ५० महत्त्वाचे नेते उपस्थित होते. मात्र यावेळी बोलताना ‘कट्टरतावादी मुस्लिम दहशतवाद’ या शब्दांचा वापर ट्रम्प यांनी जाणीवपूर्वक टाळला. ट्रम्प यांनी त्यांच्या अध्यक्षीय प्रचारात या शब्दांचा वारंवार जाणीवपूर्वक वापर केला होता. दहशतवाद समूळ नष्ट करण्याचे आवाहन यावेळी ट्रम्प यांनी आखाती आणि मुस्लिम देशांना केले.

‘दहशतवाद संपूर्ण जगभरात पसरला आहे. मात्र शांततेचा मार्ग इथूनच सुरु होतो. याच प्राचीन आणि पवित्र भूमीतून शांततेच्या मार्गाची सुरुवात होऊ शकते. दहशतवादाविरुद्धच्या लढाईची जबाबदारी मुस्लिम राष्ट्रांनी घ्यावी आणि अशा प्रकारच्या विचारणीचा विसर पडावा, यासाठी प्रयत्न करावेत,’ असे आवाहन डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. ‘आपल्या भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जाऊ नये, याची काळजी प्रत्येक देशाने घ्यायला हवी. आपल्या देशात दहशतवाद वाढू नये, याची जबाबदारी सर्व देशांनी स्वीकारायला हवी,’ असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.

अरब इस्लामिक यूएस समीटमध्ये बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर जोरदार टीका केली. ‘गेल्या अनेक देशांपासून इराण दहशतवादाला खतपाणी घालतो आहे. इराणमधील सरकार फक्त हत्याकांडाची, इस्त्रायलवर हल्ला करण्याची, अमेरिकेला धमकावण्याची भाषा करते,’ असे ट्रम्प यांनी म्हटले. इराणच्या अध्यक्षपदी नुकतीच हसन रौहानी यांची फेरनिवड झाली आहे.