देशभरच्या शुद्धीकरण प्रकल्पांत अमेरिकी तेलाच्या चाचण्यांना सुरुवात

अमेरिकेने दोन वर्षांपूर्वी त्यांच्या खनिज तेलाची निर्यात जागतिक बाजारपेठेत सुरू केल्यानंतर भारताने आखाती देशांवरील अवलंबित्व कमी करण्याच्या हेतून अमेरिकी तेल नमुन्यांच्या चाचण्या देशातील शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये सुरू केल्या आहेत. आगामी काळात भारत अमेरिकी तेलाचा मोठा ग्राहक बनेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

us citizenship news
अमेरिकेचं कायमस्वरुपी नागरिकत्व स्वीकारणाऱ्यांमध्ये भारतीय दुसऱ्या क्रमांकावर; २०२२ चा आकडा थेट ६६ हजारांच्या घरात!
US to impose new sanctions against Iran
इस्रायलवर केलेला हल्ला इराणला भोवणार, अमेरिकेने उचललं ‘हे’ मोठं पाऊल
us ambassador to india
“भविष्य घडवायचं असेल, तर भारतात या”; अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांच्याकडून भारताचं कौतुक
baltimore
US Bridge Collapse: धोक्याची सूचना देणाऱ्या भारतीय खलाशांचे जो बायडेन यांनी मानले आभार

भारत आपल्या गरजेपैकी बहुतांश खनिज तेल आयात करतो. त्यात आखाती देश भारताचे पारंपरिक तेल पुरवठादार राहिले आहेत. गेल्या काही वर्षांत भारताने आफ्रिकेतील नायजेरियासारख्या देशांतून तेल आयात करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेत तेलाचे मोठे साठे असले तरी अमेरिका जागतिक बाजारात तेल निर्यात करत नव्हती. अमेरिकेने ही निर्यातबंदी २०१५ साली उठवली. त्यानंतर जागतिक बाजारात अमेरिकी तेल मोठय़ा प्रमाणात येऊ लागले. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने दिवसाला २० लाख बॅरल तेल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत धाडून नवा आठवडी उच्चांक प्रस्थापित केला. त्यात भारताचा वाटा खूपच कमी असला तरी भविष्यात तो वाढण्याचे संकेत आहेत.

कोणत्याही नव्या स्रोताकडून खनिज तेल आयात करण्यापूर्वी त्याचे नमुने विकत घेऊन देशातील तेल शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये तपासले जातात. भारतातील तेल शुद्धीकरण कारखान्यांत सध्या अमेरिकी तेलाचे नमुने तपासण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे.

भारतातील अनेक तेल शुद्धीकरण कारखाने अमेरिकी तेलाच्या चाचण्या घेण्यास उत्सुक आहेत, असे अमेरिकेतील ह्य़ुस्टन येथील एका तेल दलालाने सांगितले. अमेरिकेतील पश्चिम टेक्सास प्रांतातील पर्मियन बेसिन, त्याच्या काहीसे पूर्वेकडील ईगल फोर्ड, अमेरिकी आखातातील मार्स सोअर आणि सदर्न ग्रीन कॅनियन या प्रकारचे तेल भारतात चाचण्यांसाठी आणले जात आहे.

जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीत अमेरिकेकडून भारताला तेलपुरवठय़ाबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने अमेरिकी खनिज तेलाच्या आयातीला चालना दिली आहे. मार्च महिन्यापर्यंत भारतातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. या तेल कंपन्यांना अमेरिकी तेल आयात करण्याची विशेष परवानगी देण्यात आली.

या कंपन्या आखाती देशांच्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अमेरिकी तेलाची आयात वाढवत असल्याचे न्यूयॉर्कमधील कॅपिटल एलएलसी या एनर्जी हेज फंडाचे भागीदार जॉन किल्डफ यांनी सांगितले.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑगस्टमध्ये कंपनी नायजेरियाऐवजी अमेरिकेतून तेल आयात करण्याची शक्यता पडताळून पाहत होती. या कंपनीने सप्टेंबरमध्ये प्रथम अमेरिकी तेल आयात केले.

आयकॉन शिपिंगच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबरच्या सुरुवातीला २० लाख बॅरेल अमेरिकी तेल भारतात उतरवले गेले. त्यानंतर आणखी ३० लाख बॅरल तेल नोव्हेंबरमध्ये येणे अपेक्षित आहे. ऑगस्टमध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने अमेरिकेतील ट्रॅफिग्युरा व्यापारी कंपनीकडून प्रत्येकी ९ लाख ५० हजार बॅरल ईगल फोर्ड शेल आणि मार्स क्रूड या प्रकारचे तेल विकत घेतले. या कंपनीने ऑक्टोबरमध्ये अमेरिकेतील सदर्न ग्रीन कॅनियन आणि डब्ल्यूटीआय मिडलॅण्ड क्रूड प्रकारचे प्रत्येकी १० लाख बॅरल तेल विकत घेतले.

या सरकारी तेल कंपन्यांसह खासगी क्षेत्रातील रिलायन्स इंडस्ट्रीज लि.ने अमेरिकेतून प्रत्येकी १० लाख बॅरल मिडलॅण्ड आणि ईगल फोर्ड प्रकारचे तेल विकत घेतले असून ते नोव्हेंबरमध्ये भारतात दाखल होईल.