पाकिस्तानच्या मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटला भारताच्या रीसर्च अ‍ॅनॅलिसिस विंग या गुप्तचर संस्थेने अर्थ पुरवठा करून प्रशिक्षणही दिले, त्यामुळे कराचीत अशांतता माजवण्यात भारताचा हात होता, या ‘बीबीसी’च्या वृत्ताला दुजोरा देणारे कुठलेही पुरावे देण्यास या प्रकरणी चौकशी करणाऱ्या पोलिसांनी असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे बीबीसीच्या बातमीतील हवा निघून गेली आहे. ब्रिटनच्या महानगर पोलिसांनी याबाबत केलेले निवेदन हे बीबीसीच्या वृत्तास दुजोरा दणारे नाही. बीबीसीच्या बातमीत असे म्हटले होते, की मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटच्या एका वरिष्ठ नेत्याने ब्रिटनच्या महानगर पोलिसांकडे दिलेल्या कबुलीनुसार त्यांना भारताच्या गुप्तचर संस्थेकडून पैसा मिळत असून त्याच्या मदतीने कराचीत अशांतता माजवली जात आहे. भारताने त्या आरोपाचे त्याच वेळी खंडन केले होते व आता तर हा आरोप खोटा ठरला आहे. मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचे नेते अल्ताफ हुसेन हे लंडनमध्ये राहतात व त्यांचे जाबजबाब ब्रिटिश पोलिसांनी घेतले होते पण ते आर्थिक साठेबाजीच्या आरोपावरून घेतले होते.
बीबीसीने ही बातमी दिल्यानंतर त्याबाबतची कागदपत्रे ब्रिटिश पोलिसांच्या हवाल्याने पाकिस्तानात सोशल मीडिया संकेतस्थळांवर टाकण्यात आली, पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनीही ती छापली होती. मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचा नेता तारिक मीर याचे जाबजबाब घेतल्याची ती लेखी कागदपत्रे होती. या कागदपत्रांबाबत ब्रिटिश पोलिसांनी सांगितले, की यातील एक कागद हा खरा आहे व दुसरा खरा आहे की नाही हे सांगता येणार नाही, शिवाय अशी कागदपत्रे जाहीर केल्याने त्याचा चौकशीवर परिणाम होऊ शकतो, जी कागदपत्रे टाकली आहेत, त्यांना पोलिसांची कागदपत्रे म्हणता येणार नाही, कदाचित तिसऱ्याच लोकांनी ही कागदपत्रे प्रसारमाध्यमांना दिली असावीत त्यामुळे ती आम्ही दिलेली नाहीत व खरीही नाहीत.